गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची चिन्हे दिसू लागल्याने वीट उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी, निडगल, गणेबैल, देसूर, भंडरगाळी आदी ठिकाणी मोठ्याप्रमाणात वीट उत्पादन केले जाते. त्यामुळे या भागांमध्ये रस्त्याशेजारी शिवारात विटांचे मोठे मोठे साठे रचून ठेवलेले पहावयास मिळतात. विटा बनवण्याचा मोसम सुरू झाला की याठिकाणी वीटभट्ट्या धडपडताना दिसतात तसेच कामगारांची वर्दळ पहावयास मिळते. या भागातील वीट उत्पादकांकडून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
सध्या गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अवकाळी पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. तेंव्हा जर का अवकाळी पावसाने झोडपले तर गर्लगुंजी, निडगल, गणेबैल, देसूर, भंडरगाळी या भागात मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवलेला विटांचा साठा मातीमोल होणार आहे. ज्यामुळे वीट उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. यामुळेच सध्या तालुक्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि पर्यायाने निर्माण झालेल्या अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून वीट उत्पादकांनी आपापल्या विटांचे साठे प्लास्टिकची आच्छादने घालून सुरक्षित केले आहेत.
यदाकदाचित अवकाळी पावसाने झोडपल्यास आच्छादने घालून झाकलेल्या या तयार विटांचे थोडेफार नुकसान होणार हे निश्चित असल्यामुळे ते नेमके किती होणार? या चिंतेत वीट उत्पादक आहेत. दरम्यान काल शनिवारी खानापूर तालुक्याच्या आसपास काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. अनमोड भागाला काल पावसाने झोडपून काढले. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातही काल शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ज्वारीसह कडधान्य पिकांना याचा फटका बसला आहे. सांबरा, मोदगा, सुळेभावी, मुतगा आदी भागात काल सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरींनी हजेरी लावली होती.