कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने देशातील आपल्या सर्व रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत रद्द केल्या आहेत. बेळगांवमार्गे धावणाऱ्या 30 हून अधिक रेल्वेगाड्या रद्द झाले आहेत त्यामुळे तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांमध्ये परतावा मिळण्यासंबंधी धास्ती निर्माण झाली होती. तथापि त्यांना त्यांच्या तिकिटाची रक्कम परत मिळणार असून आरक्षण केलेल्या तिकीटासंबंधी परतावा करण्यासंदर्भात रेल्वे खात्याने काही नियम शिथल केले आहेत. तसेच प्रवाशांना 21 जून 2020 पर्यंत परताव्याची मागणी करता येणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून देशातील संपूर्ण रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. बेळगाव रेल्वेस्थानकमार्गे धावणाऱ्या सुमारे 30 हून अधिक रेल्वे देखील रद्द झाल्या आहेत. त्यामुळे आरक्षित केलेल्या तिकिटाचे पैसे परत मिळणार की नाही? अशी धास्ती प्रवाशांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र तिकीट रद्द झालेल्या प्रवाशांचे पैसे लवकरच मिळतील, अशी माहिती रेल्वे खात्याच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच यासंबंधी असलेले कांही नियम शिथिल करण्यात आले आहेत. प्रवाशांना 21 जून 2020 पर्यंत तिकीट रकमेच्या परताव्याची मागणी करता येणार आहे. तथापि सध्या तिकीट काऊंटर आरक्षण काऊंटर पार्सल व लगेच कार्यालय ही बंद करण्यात आली आहेत.
देशातील मालगाडी रेल्वेसेवा वगळता एक्सप्रेस, रेल्वे मेट्रो, पॅसेंजर मेल, कोलकाता मेट्रो रेल व कोंकण रेल्वे सेवा 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी 31 मार्चपर्यंत नागरिकांना रेल्वेचे ऑनलाईन बुकिंग करता येणार नसल्याची सूचनाही करण्यात आली आहे. तसेच 1 एप्रिलनंतर तिकीट बुकिंग करण्यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. सध्या कोरोनामुळे भयावह स्थिती निर्माण झाली असल्याने प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर येण्याचे टाळावे, असे आवाहन देखील रेल्वे खात्याने केले आहे. कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे बेळगावहून महाराष्ट्र व गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वेंसह देशातील एकूण 3700 रेल्वे सेवा बंद झाल्या आहेत.