नैऋत्य रेल्वेकडून आपल्या विभागातील बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, रायबाग, कुडची, खानापूर आणि घटप्रभा या पाच रेल्वेस्थानकांसह एकूण 60 रेल्वेस्थानकांवर “क्यूआर कोड टिकेटींग” सुविधा उपलब्ध केली जात आहे. या सुविधेमुळे प्रवासी संबंधित रेल्वे स्थानकांवरून भारतीय रेल्वेच्या विविध रेल्वेगाड्यांची विनाआरक्षित तिकीटे ऐनवेळी खरेदी करू शकणार आहेत.
रेल्वे स्थानकांवर ही क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आता प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. ते विनाकागद तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकतील. ज्यामुळे त्यांचे श्रम ही वाचतील आणि वेळेचीही बचत होईल. आज-काल रेल्वेच्या यूटीएस अॅपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्यामुळे हे ॲप चांगलेच लोकप्रिय झाले आहे. या अॅपमुळे तसेच क्यूआर कोड तिकीट सुविधेमुळे शेवटच्या क्षणी प्रवासी आपले तिकीट आरक्षित करू शकतात. प्रवाशांच्या सोयीसाठी भविष्यात संपूर्ण रेल्वे सेवेचे डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेने “यूटीएस अॅप” हा नैऋत्य रेल्वेचा मुख्य डिजिटल मार्ग आहे.
प्रवाशांनी फक्त भारतीय रेल्वेकडून सदर यूटीएस अॅप आपल्या मोबाईल फोनवर डाऊनलोड करून घेऊन “रजिस्ट्रेशन” आणि “लॉगईन” प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या ॲपद्वारे आपले अकाऊंट तयार केल्यानंतर प्रवाशी आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचे आहे आणि कशा पद्धतीचे तिकीट हवे आहे हे निश्चित करून तिकिट आरक्षित करू शकतात. यूपीएस ॲप आरक्षित केलेल्या तिकिटाचा क्यूआर कोड निर्माण करेल जो रेल्वे स्थानकावर तिकीट स्कॅनिंग प्रसंगी वापरला जाईल. या नव्याने कार्यान्वित झालेल्या क्यूआर कोड पद्धतीमुळे तिकीट खरेदीचा वेग तर वाढवेलच शिवाय तिकीट काढण्यासाठी लागणाऱ्या वेळेचीही बचत होणार आहे.