“सिव्हिल हॉस्पिटल मधील प्रसूत महिलांसह नवजातकांचे आरोग्य धोक्यात” या शीर्षकाखाली बेळगाव लाईव्हने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन हॉस्पिटल प्रशासनाने qQ1यापीएनसी वाॅर्ड – 2 तात्काळ अन्यत्र चांगल्या स्वच्छ ठिकाणी हलविला आहे.
बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमधील जुन्या प्रसूतीत्तोर विभाग क्र. 2 अर्थात पीएनसी – 2 वॉर्डच्या एका कोपऱ्यात त्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाचा टाकाऊ चिखल मातीचा ढिगारा टाकण्यात आला आहे. परिणामी बाळ आणि बाळंतीणी असणाऱ्या या वॉर्डमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरण पसरलेले आहे. बांधकाम सुरू असल्यामुळे सदर वाॅर्डामध्येच कामगार आपली दुरुस्तीची कामे करत असल्यामुळे वॉर्डातील रुग्णांना प्रचंड त्रास होत होता. या त्रासाव्यतिरिक्त वार्डात जे अस्वच्छ वातावरण पसरले होते ते वेगळेच. त्यामुळे नवजात बालके आणि त्यांच्या मातांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत बेळगाव लाईव्हने बुधवारी वृत्त प्रसारित करून आवाज उठविला होता.
सदर वृत्ताची दखल घेऊन बीम्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी तात्काळ कार्यवाही करत सदर पीएनसी वॉर्ड – 2 जुन्या जागेतून अन्यत्र हलविला आहे. नव्या जागेतील या वॉर्डच्या स्वच्छतागृहाचे नुतनीकरण केले जात असून हे काम 15 दिवसात पूर्ण होणार आहे. दरम्यान पूर्वीच्या अस्वच्छ जागेतून पीएनसी वाॅर्ड – 2 अन्यत्र चांगल्या स्वच्छ जागेत स्थलांतरित करण्यात आल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त होत असून ते डॉ. दास्तीकोप यांना धन्यवाद देत आहेत.