बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आज गुरुवारी एसपीएम रोड, शिवाजी उद्यान शेजारील महापालिकेच्या ग्रंथालयाची जुनी इमारत जेसीबी फिरून जमीनदोस्त करण्यात आली. सदर ग्रंथालय हे शहरातील जुन्या ग्रंथालयांपैकी एक होते, आता ते नामशेष झाल्यामुळे जुन्याजाणत्या मंडळींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी विविध विकास कामे राबविली जात आहेत. या अनुषंगाने शहरवासीयांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी डिजिटल लायब्ररी उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. सध्याच्या डिजिटल आणि संगणकीय युगात युवा पिढीचे पुस्तकाचे वाचन कमी झाले आहे.
युवा पिढीचा सर्रास ओढा अत्याधुनिक सुविधांकडे जास्त आहे हे लक्षात घेऊन जुन्या काळातील ग्रंथालय म्हणून ओळख असलेल्या शिवाजी उद्याना शेजारील महापालिका ग्रंथालयाच्या जागेवर डिजिटल लायब्ररी निर्माण केली जाणार आहे. मोडकळीस आलेली सदर ग्रंथालयाची इमारत हटविण्याच्या कामास काल बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर आज गुरुवारी दिवसभरात ही इमारत हटवून जागा मोकळी करण्यात आली. या पद्धतीने बेळगावातील सर्वात जुने असे हे ग्रंथालय कालबाह्य झाले आहे.
या इमारत जागेवर लवकरच एक दुमजली इमारत उभारण्यात येणार असून त्याठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या डिजिटल लायब्ररीसाठी 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या दुमजली इमारतीच्या टेरेसवर खुले वाचनालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान संबंधित जुने वाचनालय जमीनदोस्त करण्यात आल्याने वाचनप्रेमी जुन्या जाणकार मंडळींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.