कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशावरून येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरीदेवी, श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मीदेवी असा पुढल्या एप्रिल महिन्यात होणारा संयुक्त यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे सालाबादप्रमाणे यानिमित्त होणारे महाराष्ट्र कुस्ती मैदान देखील रद्द झाले आहे.
येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर ट्रस्ट कमिटी, येळ्ळूर यात्रा गाव कमिटी व ग्रामस्थ कमिटीच्या आज सोमवारी रात्री 8 वाजता झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री चांगळेश्वरी मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष एन. के. कंग्राळकर हे होते. धोकादायक कोरोना विषाणूचे सध्या सर्वत्र थैमान सुरू आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने यात्रोत्सवासारख्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना एकत्र जमा करणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. शासनाने त्या आशयाचे पत्र येळळूर ग्रामपंचायतीला पाठविले आहे.
सदर पत्राबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चा होऊन शासनाच्या आदेशाला पाठिंबा दर्शवत यंदाचा येत्या 13 ते 16 एप्रिल 2020 या कालावधीत होणाऱ्या श्री चांगळेश्वरीदेवी, श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मीदेवी अशा संयुक्त यात्रोत्सवासह महाराष्ट्र कुस्ती मैदान रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी श्री चांगळेश्वरी मंदिर ट्रस्ट कमिटी, येळ्ळूर यात्रा गाव कमिटी व ग्रामस्थ कमिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच येळ्ळूर ग्रामस्थ उपस्थित होते.