बेळगाव तालुक्यात अघोषित वीज कपातीचा सपाटा सध्या सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होत आहे. तालुक्यातील विविध भागांत सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वीज जाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नागरिकांबरोबरच विद्यार्थ्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा होईपर्यंत तरी वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.
बेळगाव तालुक्यात अचानकपणे वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अघोषित वीज पुरवठा खंडित करून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय करण्याचा प्रयत्न हेस्कॉमने सुरू केला आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या अघोषित वीज कपातीमुळे शेतीवरही याचा परिणाम जाणवू लागला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे विध्यार्थी आता अभ्यासात गुंतले आहेत. मात्र अघोषित वीज पुरवठा करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याचा विचार हेस्कॉम करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. फेब्रुवारीच्या मध्यवर्ती पासून उन्हाचे चटके तीव्र होऊ लागले आहेत. त्यामुळे घरात पंख्यांची आणि एअरकुलर ची मागणी वाढली आहे. मात्र घोषित वीज पुरवठ्यामुळे अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हाळा सुरू झाल्यामुळे काही गावात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आतापासून काही गावांमध्ये आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यावर भर दिला आहे. जलकुंभ भरत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे वीज समस्या आहे. त्यामुळे ह्या सारा विचार करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.