Tuesday, December 24, 2024

/

जिल्ह्यात एकूण 167 संशयितांची वैद्यकीय तपासणी : कोरोना बाधितांची संख्या शून्य

 belgaum

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 167 संशयित व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून एकूण 132 जणांनी 14 दिवसांचा विलगीकरण (आयसॉलेशन) कालावधी पूर्ण केला आहे. तसेच कोरोना विषाणू निदानासाठी दोघा व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले असून अद्याप कोरोना बाधितांची संख्या शून्य आहे, अशी माहिती कर्नाटक सरकारच्या बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सदर प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 21 मार्च 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 167 संशयित व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. 14 दिवसांसाठी विलगीकरण (आयसोलेशन) केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 132 असून यापैकी हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या शून्य आहे. आयसोलेशन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 32 आहे, तर आयसोलेशनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 3 आहे. कोरोना विषाणू निदानासाठी दोघाजणांचे नमुने घेण्यात आले असून सकारात्मक व नकारात्मक नमुन्यांची संख्या शून्य आहे. त्याचप्रमाणे दोघा व्यक्तींचा वैद्यकीय नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरी विलगीकरणासाठी 14 दिवस घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाइन कॉल सेंटरशी संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सामाजिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.