धोकादायक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शहापूर रंगपंचमीनिमित्त आज शुक्रवारी रंगाऐवजी विविध रंगांच्या पुष्प दलांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम कै. नारायणराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आला.
होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी पूर्वीच्या सांगली संस्थानातील शहापूर आणि वडगावसह अनगोळ येथे रंगपंचमी साजरी करण्यात आली. जीवघेण्या कोरोना विषाणूच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक रंगपंचमी शक्यतो टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
त्या अनुषंगाने कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी कै. नारायणराव जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे आज एकमेकांवर रंगबिरंगी पुष्प दलांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या हस्ते या आगळ्या रंगपंचमीचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नेताजी जाधव, मनपाचे निवृत्त अधिकारी अर्जुन देमट्टी, माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष अशोक चिंडक, राजू सुतार, प्रभाकर भागोजी, रवी साळुंखे, विजय जाधव, सुरेश धामणेकर, गजानन भागोजी, सतीश शिंदे, सुभाष शिनोळकर, साईराज जाधव आदी उपस्थित होते.