होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 9 व मंगळवार दिनांक 10 रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त बी एस लोकेश कुमार यांनी दिले आहेत. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ही मद्य विक्री बंद ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी एका पत्रकात म्हटले आहे.
सध्या वेगवेगळ्या देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू बाबत अनेकांमध्ये धास्ती लागून राहिली आहे. याची काळजीही पोलिसांनी घेतली असून एकत्रीतपणे रंग न खेळता वेगवेगळे होऊन रंग खेळा असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर मद्य विक्रीचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.
सोमवारी होणारी होळी व मंगळवारी होणाऱ्या रंगोत्सवावर कोणतेही संकट येऊ नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. संपूर्ण जगात बोकाळलेल्या कोरोनाबाबत काळजी घेत होळी साजरी करा असेही त्यांनी म्हटले आहे.
होळी व रंगसोहळाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचबरोबर गुण्यागोविंदाने रंगोत्सव साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच मद्यविक्री दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत मद्यविक्री बंद असणार असून होळी सणाच्या पार्श्वभूमीवर साऱ्यांनी शांतता पाळावी असे आव्हानही पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांनी केले आहे.