संगीताच्या क्षेत्रात पंचवीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या अर्चना आनंद बेळगुंदी यांनी आजवर हजारहून अधिक जणांना संगीताचे शिक्षण दिले आहे.बालपणापासूनच त्यांची सप्तसुरांशी मैत्री जमली.शाळेत शिकताना अनेक गायनाच्या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवून आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले.त्यांची आई कमल अध्यापक या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या आणि त्यांना गायनाची आवड होती.भजन आणि गाणी त्या खूप सुरेख गायच्या.आईकडूनच गायनाचा वारसा अर्चना यांना लाभला.
विवाहा नंतर त्यांनी काही वर्षांनी टिळकवाडी रॉय रोड येथे अर्चना संगीत विद्यालयाची स्थापना केली.त्यांच्याकडे गाणे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चार वर्षांपासून सत्तर वर्षापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे.लहान मुलांना शिकवणे हे खूप अवघड असते.त्यात गाणे म्हणायला लहान मुलांना शिकवायचे हे त्याहूनही अवघड.पण लहान मुलांना गाणे शिकवण्याची हातोटी अर्चना यांना लाभली आहे.लहान मुलांना शिकवण्यासाठी सहनशक्ती खूप असावी लागते आणि ती त्यांच्याकडे आहे.
त्यांच्याकडे गायन शिकलेले अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी टीव्ही वरील अनेक कार्यक्रमात चमकले आहेत.त्यांच्या विद्यार्थ्यांनी देशातील अनेक प्रतिष्ठेच्या गायन स्पर्धात भाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे.अनेक विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.देशातील अनेक प्रतिष्ठित संगीतसभामध्ये अर्चना यांनी हजेरी लावली आहे. अनेक राज्यात त्यांचे आणि त्यांच्या शिष्यांचे गाण्याचे कार्यक्रम झाले आहेत.
सकाळपासून संगीताचे वर्ग सुरू होतात ते सायंकाळ पर्यंत चालतात.मुलांना शिकवण्यात आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो.आपण शिकवलेले विद्यार्थी जेव्हा एखादी स्पर्धा जिंकतात तेव्हा तर मला अत्यानंद होतो.
टीव्ही चॅनेल वर सुरू असलेल्या सा रे ग म सारख्या कार्यक्रमामुळे मुलांना गाणे शिकण्यासाठी पाठवायची मानसिकता तयार झाली आहे.पण संगीत आत्मसात करण्यासाठी नियमितता,कठोर परिश्रम यांची खूप आवश्यकता असते असे अर्चना बेळगुंदी सांगतात.