सकाळी फिरावयास जाणाऱ्या मॉर्निंग वॉकर्सनी एका विषारी अस्सल नाग सापाची भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्याची घटना गुरुवारी सकाळी जंगल सदृश्य व्हॅक्सिन डेपो परिसरात घडली.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसर हा वृक्षवल्लींनी नटलेला हिरवागार जंगल सदृश्य प्रदेश असल्यामुळे याठिकाणी सकाळी गटागटाने फिरायला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या मॉर्निंग वॉकर्सपैकी बहुतांश मंडळी ही एक तर पर्यावरण प्रेमी आहेत किंवा प्राणी मित्र आहेत. गुरुवारी सकाळी यापैकी काही मंडळी नेहमीप्रमाणे व्हॅक्सिन डेपोच्या आतील भागात फेरफटका मारत असताना त्यांना एका ठिकाणाहून कुत्र्यांच्या कळपाचा जोरजोराने भुंकण्याचा आवाज आला. तेंव्हा त्या मॉर्निंग वाॅकर्सनी जवळ जाऊन पाहिले असता एका मृत सापानजीक एक अस्सल नागसाप फणा उभारून फुत्कार टाकत होता आणि मोकाट कुत्री त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होती.
कुत्र्यांच्या हल्ल्यात त्या नाग सापाच्या शेपटीला दुखापत झाल्याचे दिसून येत होते. मृत साप हा बहुदा त्या अस्सल नागाचा सहकारी असावा. कारण त्यामुळेच की काय मोकाट कुत्री आक्रमक झाली असतानाही तो नागसाप त्या मृत सापाच्या शेजारून हलण्यास तयार नव्हता. फणा उभारून जोराचे फुत्कार टाकत तो त्या कुत्र्यांना डंख मारण्याचा प्रयत्न करत होता.
हा प्रकार पाहून मॉर्निंग वाकर्स मंडळी कांही क्षण स्तंभीत झाली होती. तथापि मोकाट कुत्र्यांच्या कळपासमोर त्या नाग सापाचा निभाव लागणार नाही हे लक्षात येताच त्यांनी दगडफेक करून कुत्र्याच्या कळपाला पळवून लावले. तथापि त्यानंतरही तो नागसाप जागेवरून हलण्यास तयार नसल्याचे पाहून मॉर्निंग वाकर्स मंडळींनी तिथून काढता पाय घेतला. मात्र थोडा कालावधी उलटून गेल्यानंतर त्या मॉर्निंग वॉकर्स मंडळींपैकी काहींनी उत्सुकतेपोटी पुन्हा त्या घटना स्थळी भेट दिली असता नागसाप तेथून निघून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सकाळी फिरावयास जाणाऱ्या सुजाता दरेकर या उपरोक्त घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार होत्या. दरेकर यांनी त्या घटनेची आणि जखमी अस्सल नाग सापाची छायाचित्रे देखील काढली आहेत. मृत साप अद्यापही तेथेच पडून असल्यामुळे जखमी झालेला तो अस्सल नाग पुन्हा कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी येऊ शकतो हे ध्यानात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून कांही दिवस त्या भागातून फिरायला जाणे बंद करण्याचा निर्णय मॉर्निंग वाॅकर्सनी घेतला आहे.