परकीय अर्थात विदेशी भाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा फक्त विद्यार्थी होतो आणि मातृभाषेत शिकलेल्या विद्यार्थ्याचा माणूस होतो, असे विचार प्रा. मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे महात्मा फुले रोड येथील मराठा संस्कृतीक भवन येथे आज रविवारी दुपारी आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते यानात्याने प्रा. मायाप्पा पाटील बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, नगरसेवक महेश कोरी, माजी आमदार अरविंद पाटील, म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
“मातृभाषेतून शिक्षण यशस्वी : यशस्वी जीवनाचा मंत्र” या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. मायाप्पा पाटील पुढे म्हणाले की, इंग्रजी भाषेला माझा विरोध नाही, मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यास माझा विरोध आहे. इंग्रजी शिकलेला हमखास नोकरी मिळते हा चुकीचा समज आहे. आपण आपल्या मुलांना मराठी भाषा शिकवली तर जगाच्या पाठीवरील कोणतीही भाषा ते शिकू शकतात. मात्र याचा पाया मात्र मातृभाषेने पक्का असावा लागतो. आपली मातृभाषा आणि विदेशी भाषा यांची तुलनाच होऊ शकत नाही. “मातृभाषेतून शिक्षण शिकणे हा माझा नैसर्गिक जन्मसिद्ध अधिकार आहे” हे रवींद्रनाथ टागोर यांचे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपण उष्णकटिबंधात राहतो त्यामुळे आपल्या भाषेच्या स्वरांमध्ये जबरदस्त ताकद आहे याउलट शीत कटिबंधात राहणाऱ्या इंग्रजी भाषेमध्ये तशी ताकद नाही. पैशाची प्रौढी मारण्यासाठी मुलांना इंग्रजी शाळेत घालणे,त्यांना खाजगी शिकवण्या लावणे ही घोडचूक मराठी पालकवर्गाकडून होत आहे. आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की इंग्रजी भाषेकडे वळण्याची गरज नाही, असेही प्रा. मायाप्पा पाटील यांनी सांगितले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सीमाभागात मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. माझे वडील सीमा लढ्यात होते. त्यामुळे सीमाप्रश्न आपल्याला विशेष जिव्हाळा असल्याचेही नगराध्यक्षा कोरी यांनी सांगितले.
प्रारंभी म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केल्यानंतर प्रमुख पाहुण्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात युवा समितीतर्फे घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आणि आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत कदम, धनंजय पाटील आदींसह महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच म. ए. समिती युवा आघाडीचे पदाधिकारी व सदस्य तसेच सामान्य ज्ञान स्पर्धेतील स्पर्धक, त्यांचे समर्थक, पालक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी म. ए. युवा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.