जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू जगभरात पसरल्याचे जाहीर केल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार नैऋत्य रेल्वेने (एसडब्ल्यूआर) आपल्या कार्यक्षेत्रातील बेळगावसह अन्य महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर खास “मेडिकल हेल्प डेस्क” अर्थात वैद्यकीय मदत विभाग सुरू केला आहे.
या मेडिकल हेल्प डेस्कचे वैद्यकीय कर्मचारी कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करून प्रवाशांना कोरोना बाबत सज्ञान करतील. या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना स्काऊट अँड गाईडचे सहकार्य लाभेल आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मेडिकल हेल्पडेस्कवरील प्रत्येक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यास संदर्भातील आवश्यक अद्ययावत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
सध्या हुबळी, म्हैसूर, बेंगलोर, वास्को-द-गामा, विजयपुरा, बेळगाव, गदग, बेळ्ळारी, होस्पेट अळनावर आणि बागलकोट या रेल्वे स्थानकांवर हा हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. बेंगलोर विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर हे मेडिकल हेल्प डेस्क सुरू करण्यात आले असून उर्वरित स्थानकांवर येत्या दोन-तीन दिवसात ते सुरू केले जाणार आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव संदर्भात जनजागृती कार्यक्रमाच्या अग्रभागी असणारा पथकामध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांना ओळखून त्यांना तपासणीसाठी घेऊन येण्यात रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी मेडिकल हेल्प डेस्कच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करतील.