मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी सातत्याने अशी मराठी साहित्य संमेलने भरविणे तसेच आपल्या मुलांना मराठी वाचनाची आवड लावणे ही काळाची गरज आहे, असे मत पुण्याच्या जडण-घडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी व्यक्त केले.
मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळ बेळगाव पश्चिम विभाग आणि बेनकनहळ्ळी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी आयोजित 6व्या मराठी सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी संमेलनाध्यक्ष या नात्याने डॉ. सागर देशपांडे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे उद्योजक अमर अकनोजीचे,जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे, भाऊराव शहापूरकर, प्रसाद चौगुले, रमेश रेडेकर, प्रमुख व्याख्यात्या पुण्याच्या हृदयरोग तज्ञ डॉ. ज्योत्स्ना पाटील, शिवश्री नंदकुमार गावडे, हभप प्रणम वीरभद्रराव जोशी, एकनाथ पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सागर देशपांडे यांनी सीमा आंदोलनात आपण देखिल पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आहेत असे सांगून गेल्या 63 वर्षापासून सीमा भागातील मराठी बांधव ज्या आत्मविश्वासाने व जिद्दीने सीमाप्रश्नी लढा देत आहे त्याला तोड नाही. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात असला तरी त्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल. तथापि महाराष्ट्रातील नेत्यांनी यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत असे डॉ. देशपांडे म्हणाले. मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी अशी साहित्य संमेलने भरवण्याबरोबरच गावोगावी ग्रंथालये स्थापन झाली पाहिजेत. तसेच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. आज-काल इंग्रजीला अवास्तव महत्त्व दिले जात आहे, तथापी मातृभाषेत शिक्षण घेऊनही आपण आपले भवितव्य उज्वल करू शकतो, असेही डॉक्टर सागर देशपांडे यांनी स्पष्ट केले.
डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी आपल्या भाषणात आरोग्याचे महत्त्व विशद केले. आपण सर्वांनी बौद्धिक सुखाचा मोह टाळून नियमित व्यायाम आणि सकस आहार यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे ताणतणाव वाढून आपण रोगांना आमंत्रण देत आहोत. हे टाळण्यासाठी चालणे, पळणे, जलतरण, सूर्यनमस्कार, योगा आदी व्यायाम आपण नियमित केले पाहिजेत. तसेच कोणताही आजार अंगावर न काढता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आहारामध्ये पालेभाज्या आणि सॅलेडवर अधिक भर दिला गेला पाहिजे, असेही डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी स्पष्ट केले.
रविवारी सकाळी ग्रंथदिंडीने सदर संमेलनाचा शुभारंभ झाला. यावेळी जायन्ट्स ग्रुप बेळगावचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन झाले, तर ग्रंथदिंडीचे पूजन ग्रा.पं. सदस्य कल्लाप्पा देसुरकर यांनी केले. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्या प्रेमा हिरोजी, मारुती काटकर, लता पाटील, ज्योतिबा पिसाळे, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. गावातून सवाद्य निघालेल्या या ग्रंथदिंडीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठी मुला – मुलींची शाळा बेनकनहळ्ळी येथील संमेलनस्थळी या ग्रंथदिंडीचे सांगता झाली. संमेलनाच्या प्रवेशद्वारासह सभामंडपाचे उद्घाटन झाल्यानंतर डॉ सागर देशपांडे डॉ ज्योत्स्ना पाटील, उद्योजक अमर अकनोजीचे, म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे, भाऊराव शहापूरकर प्रसाद चौगुले रमेश रेडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनने संमेलनाला सुरुवात झाली.
याप्रसंगी शिवश्री नंदकुमार गावडे यांनी “शिवशंभुचा आदर्श काय घ्यावा?” या विषयावर आणि हभप प्रणम वीरभद्रराव जोशी यांनी “संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज चरित्र” या विषयावर आपले विचार व्यक्त केले
संमेलनास ता. पं. सदस्या रंजना कोलकार, अशोक पाटील, बापू देसुरकर, लक्ष्मण खांडेकर, कृष्णा कुडचीकर, निकिता पाटील पुंडलिक पाटील विश्वास पवार आदींसह बहुसंख्य साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते