महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या बेळगावसह सीमाभागातील मराठी शिक्षण संस्था आणि स्थानिक मराठी दैनिकांसाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारने आज शुक्रवारी आपला अर्थसंकल्प जाहीर केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजितदादा पवार यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात बेळगावसह सीमाभागातील मराठी शैक्षणिक संस्था तसेच मराठी दैनिकांच्या संवर्धनासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. बेळगावातील दै. तरुण भारत, दै. वार्ता, दै. रणझुंजार, दै. स्वतंत्र प्रगती या स्थानिक दैनिकाना त्यांच्या संवर्धनासाठी जाहिरातींच्या माध्यमातून सहाय्य केले जाणार असल्याचे समजते.
मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी बेळगावसह सीमाभागातील मराठी शिक्षण संस्थांना महाराष्ट्र शासनाकडून आतापर्यंत अनुदान दिले जात होते. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. सीमाप्रश्न आणि पर्यायाने सीमाभागातील मराठी बांधवांशी जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.
महाराष्ट्रात सत्तेवर येताच सीमाप्रश्नाचा निकाल लावण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आता सीमाभागातील शैक्षणिक संस्थांबरोबरच या ठिकाणच्या स्थानिक मराठी भाषिक प्रसारमाध्यमांनाही आपल्या अर्थसंकल्पाद्वारे दिलासा दिला आहे.
बेळगावातील मराठी वर्तमान पत्रांनी मराठीची चळवळ टिकवण्यासाठी योगदान दिले आहे हे सर्वश्रुत आहे महाराष्ट्र शासनाने अर्थ संकल्पात केलेल्या 10 कोटींच्या तरतुदीमुळे वर्तमानपत्र व मराठी शाळा शिक्षण संस्थांना याचा लाभ होणार आहे