कोरोना विषाणू प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशव्यापी “लॉक डाऊन” करण्यात आले आहे. इतर क्षेत्राचे माहीत नाही तथापि गुन्हेगारी क्षेत्रावर मात्र याचा सकारात्मक परिणाम झाला आहे, कारण सध्या शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गुन्हेगारीच्या आलेखामध्ये प्रचंड घट झाली असून गेल्या दोन आठवड्यात एकाही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे समजते.
लॉक डाऊनसह जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आल्यामुळे नागरिकांना घरात बसून राहावे लागत आहे. त्यामुळे सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्व दैनंदिन व्यवहार एक तर विस्कळीत अथवा ठप्प झाले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम गुन्हेगारीवर झाला आहे. सर्व व्यवहार ठप्प होऊन नागरिक घरात बसून असल्यामुळे चोरी, दरोडा, मारामारी, लुटमार आदी गुन्ह्यांची संख्या जवळपास शून्य इतकी झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेला लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील अनेक मार्गांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रमुख रस्ते आणि चौकाचौकात पोलीस थांबलेले दिसत आहेत. कोरोना संसर्गाच्या धोक्यासह हे पोलीस बंदोबस्त हे देखील गुन्हेगारी कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.