कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणाखाली येईपर्यंत राज्यातील आरोग्य खात्याच्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक तसेच अन्य सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या आयुक्तांनी एका लेखी आदेशाद्वारे हे जाहीर केले आहे.
कर्नाटकातील काही भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याने आरोग्य खात्याकडून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सदर उपाय योजना परिणामकारकरित्या राबविता याव्यात यासाठी आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील सर्व इस्पितळांचे त्याचप्रमाणे खाजगी इस्पितळांचे संचालक मंडळ, वरिष्ठ डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कायम आणि कंत्राटी कामगारांच्या सुट्ट्या तसेच रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोना संदर्भातील परिस्थिती नियंत्रणाखाली येईपर्यंत कोणालाही सुट्टी अथवा रजा मंजूर केली जाणार नाही. तसेच सध्या रजेवर असणाऱ्यांनी त्वरित कामावर रुजू व्हावे, अशा आशयाचा तपशील राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने काढलेल्या आदेश पत्रात नमूद आहे. राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, सर्व इस्पितळांचे वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य वैद्याधिकारी यांना या लेखी आदेशाची प्रत धाडण्यात आली आहे.