बेळगाव सीमा भागात मोठ्या प्रमाणात साहित्य संमेलने भरवली जातात. येथील साहित्य संमेलन संस्कृती आणि सामाजिक भान जपणारी आहेत. मात्र पोलिसांनी येथील साहित्य संमेलनावर वक्रदृष्टी टाकल्याचे दिसून येत आहे. कुद्रेमनी येथील मराठी साहित्य संमेलन आयोजकांच्या विरोधात पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली होती. त्याला चोख प्रत्युत्तर म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
नोटिशीत पाच लाख रुपयांचे हमीपत्र लिहून द्या अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायद्याच्या विरोधात जाऊन पोलिसांनी हे कृत्य केल्याचे निदर्शनास आले आहे.. मात्र नोटीस बजावणारेही पोलीस आणि फिर्याद नोंदवणारेही पोलीस. त्यामुळे नेमके काय चालले आहे असा सवाल सीमाभागातील व्यक्त करण्यात येत आहे.
आयोजकांना जी नोटीस पाठवली आहे ती एक तर्फे आहे. त्यामध्ये कायद्याचे कोणतेही उल्लंघन करण्यात आले नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र कलम 116( 3) अन्वय कोणत्याही प्रकारची आयोजकांकडे चौकशी करण्यात आली नाही. अथवा त्याबाबतचे पुरावे हि मागविण्यात आले नाहीत. त्यामुळे हा कायद्याचा भंग असून संपूर्ण कारवाई ही बेकायदेशीर आहे असे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
कुद्रेमनी साहित्य संमेलनाचे आयोजक नागेश राजगोलकर, काशिनाथ गुरव, गणपती बडसकर, शिवाजी गुरव, मोहन शिंदे यांनी ही याचिका दाखल केली आहे. या कार्यकर्त्यांच्या वतीने वकील महेश बिर्जे, एम बी बोंद्रे यांनी काम पाहिले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर आय पाटील यांच्यासह बलभीम साहित्य संघाचे अध्यक्ष एम डी गुरव व कार्यकर्ते उपस्थित होते.