कुद्रेमानी येथील मराठी साहित्य संमेलन आयोजकांच्या विरोधात पोलीस आयुक्तांनी बजावलेली नोटीस आणि त्यांच्यावर दाखल केलेला खटला मागे न घेतल्यास सीमाभागातील मराठी साहित्यिक आणि स्थानिक भाषिकासह आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून आंदोलन छेडू असा इशारा जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी दिला आहे.
कुद्रेमनी येथील मराठी साहित्य संमेलन आयोजकांच्या विरोधात पोलीस आयुक्तांनी नोटीस बजावून त्यांना गुरुवार 12 मार्च रोजी पन्नास हजाराचा बॉण्ड आणि दोन जामीनांसह पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज 12 मार्च रोजी आयोजक मंडळींसह जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यादेखील पोलीस उपायुक्त कार्यालयात आल्या होत्या. याप्रसंगी पत्रकारांनी छेडले असता सरस्वती पाटील यांनी उपरोक्त आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
गेल्या 40 वर्षांपासून कुद्रेमनीसह विविध गावांमध्ये दरवर्षी मराठी साहित्य संमेलने भरविली जातात. ही साहित्य संमेलने कोणत्याही भाषे विरुद्ध नसून मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी आहेत. तथापि आजपर्यंत कर्नाटक सरकार आणि पोलीस खात्याकडून सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. कुद्रेमनी येथे अलीकडेच संपन्न झालेले मराठी साहित्य संमेलन पोलिस खात्याकडून रीतसर परवानगी घेऊन आयोजित करण्यात आले होते. आता याच संमेलनाच्या आयोजकांवर प्रक्षोभक भाषणे करून भाषिक तेढ निर्माण करण्याचा आरोप ठेवला गेला आहे. दडपशाहीचा हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आणि अन्यायकारक आहे. तेंव्हा कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना पाठविण्यात आलेली नोटीस आणि त्यांच्यावर दाखल केलेला खटला त्वरित मागे घेतला जावा, अन्यथा सीमाभागातील साहित्यिक आणि स्थानिक मराठी भाषिकांसह मी स्वतः हून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून आंदोलन छेडणार आहे, असे जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी ठामपणे सांगितले.
अॅड. महेश बिर्जे यांनी पोलीस खात्याने कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलन आयोजकांवर केलेल्या अन्यायकारक कारवाईची माहिती दिली. याप्रसंगी कुद्रेमनी साहित्य संमेलनाच्या आयोजकांसह सुमारे 100 ते 150 युवक उपस्थित होते.