जीवन विद्या मिशन उपकेंद्र शहापूर आणि सन्मित्र साप्ताहिक वार्षिक फंड कोरे गल्ली शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित प्रवचनाच्या कार्यक्रमासह अन्य विविध कार्यक्रम शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडले.
शहापूर येथील गंगापुरी मठाच्या सभागृहांमध्ये काल शनिवारी सायंकाळी आयोजित समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, प्रवचनकार भरत पांगिरे, मनोहर देसाई, भैरू सुळगेकर आणि गीता सुळगेकर उपस्थित होते. प्रारंभी रमेश गोरल किरण गावडे आदींच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तसेच सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर शहीद जवान राहुल सुळगेकर यांना उपस्थित आणि श्रद्धांजली वाहिली.
शिव पूजनाच्या कार्यक्रमानंतर वामनराव पाई भजनी मंडळाने संगीत भजन सादर केले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मराठी भाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर, चित्रकला व संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे शहीद जवान राहुल सुळगेकर यांचे आई-वडील भैरू सुळगेकर व गीता सुळगेकर यांचा कृतज्ञापर तसेच विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यश हाळवाण्णाचे, संजय गावडोजी व गजानन गावडोजी यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. याव्यतिरिक्त माजी महापौर महेश नाईक आणि आनंदा पाटील या देणगीदारांना ही सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभानंतर रात्री सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सतशिष्य वाई महाराष्ट्राचे प्रवचनकार भरत पांगेरे यांचा “विचार शिवरायांचे, संस्कार जीवन विद्येचे” या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. त्यांनी छ. शिवाजी महाराज यांचे चरित्र सांगून महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा, असे आवाहन केले. याप्रसंगी सन्मित्र साप्ताहिक वार्षिक फंड आणि जीवन विद्या मिशनचे पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिक विशेष करून महिला बहुसंख्येने उपस्थित होते.