बेळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे लोण आपल्या गावात पसरू नये यासाठी खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प व चिगुळे गावच्या ग्रामस्थांनी आपापल्या गावचे प्रवेश मार्ग बंद करून टाकले आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोदेकोप्प व चिगुळे (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांनी गावातील लोकांना गावाबाहेर आणि बाहेरील व्यक्तीला गावात येण्यास प्रतिबंध केला आहे. सद्यपरिस्थितीत मोदेकोप्प व चिगुळे गावकऱ्यांची कृती समर्थनीय असल्याचे खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी स्पष्ट केले असून इतर गावांनी याचा आदर्श घ्यावा असे म्हंटले आहे. सदर दोन्ही गावे ही खानापूर तालुक्याच्या दुर्गम जंगल प्रदेशात आहेत.
मोदेकोप्प व चिगुळे गावकऱ्यांच्या उपरोक्त कृतीचे आणखीन एक कारण म्हणजे धारवाड येथे आढळलेला 33 वर्षीय कोरोना बाधित रुग्ण होय. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धारवाड येथे आढळून आलेला कोरोनाग्रस्त रुग्ण गेल्या 12 मार्च रोजी गोव्याहून बसने (क्र. केए26 एफ 962) धारवाडला गेला होता. या बसमध्ये त्या रुग्णाव्यतिरिक्त एका बालकासह आणखी 30 प्रवासी होते. यापैकी एक जांबोटी आणि एक खानापूरचा प्रवासी आहे. या दोघांची ओळख पटली असून त्यांना काॅरंटाईन करण्यात आले आहे. या प्रकारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोदेकोप्प व चिगुळे ग्रामस्थांनी आपापल्या गावच्या सीमा बंद केल्या आहेत.