खानापूरहुन सायंकाळी 7.30 वाजता सुटणारी पारवाड गावची वस्तीची बस त्वरित पूर्ववत सुरू न झाल्यास होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल, असा निर्वाणीचा इशारा भाजपा महिला जनरल सेक्रेटरी सौ. धनश्री करणसिंग सरदेसाई जांबोटीकर व भाजपा खानापूर शहराध्यक्ष राजेंदर रायका यांनी आज रविवारी खानापूर बस आगार प्रमुखांना दिला. तेंव्हा येत्या दोन दिवसात सदर बससेवा पूर्ववत सुरू केली जाईल असे आश्वासन खानापूर बस आगार प्रमुखांनी दिल्यामुळे खानापूर – पारवाड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये विशेष करून विद्यार्थीवर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गेल्यावर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खानापूर – जांबोटी महामार्गावरील शंकर पेठजवळील ब्रिज खराब होऊन खानापूर बस आगाऱ्यांची बस सेवा पूर्णपणे बंद झाली होती. आता पर्यायी रस्ता करून या मार्गावरच्या सर्व बसेस चालू आहेत. तथापी खानापूरहून सायंकाळी 7.30 वाजता सुटणारी खानापूर ते पारवाड वस्तीची बस अजूनही बंद आहेत. डोंगरगाव परिसरातील लोकांसाठी सरकारी कामानिमित्त अथवा नोकरीधंद्यानिमित्त सकाळ-संध्याकाळ ये-जा करण्यासाठी ही बस अत्यंत सोयीची होती. या भागातील लोकांनी सदर बस सुरू करण्यासाठी वेळोवेळी आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी करून देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
खानापूर – पारवाड वस्तीची बस बंद असल्यामुळे पारवाड गावातील चार विद्यार्थिनी रोज सकाळी 5.30 वाजता उठून 6 वाजता कुणकुंबीला येऊन मिळेल त्या बसने महाविद्यालयीन शिक्षणासाठी खानापूरला ताराराणी कॉलेजला येतात. कॉलेजमध्ये 8.30 वाजता त्यांचे वर्ग सुरू होत असल्यामुळे त्यांना ही वस्तीची बस सकाळी खूप उपयुक्त असायची.
खानापूर बस आगार प्रमुखांना वरचेवर निवेदन देऊन सुद्धा ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर पारवाड व डोंगरगाव येथील विद्यार्थ्यांनी बंद असलेली वस्तीची बस पूर्ववत सुरू करण्यासाठी जातीने लक्ष घालावे अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा महिला जनरल सेक्रेटरी सौ. धनश्री करणसिंग सरदेसाई जांबोटीकर व भाजपा खानापूर शहराध्यक्ष राजेंदर रायका यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे गावकऱ्यांनीही या उभयतांना भेटून वस्तीची बस नसल्यामुळे होत असलेले मुलांचे शैक्षणिक नुकसान सांगून त्वरित बस चालू करा असे निवेदन दिले होते.
या निवेदनांची दखल घेऊन सौ. धनश्री करणसिंग सरदेसाई जांबोटीकर व राजेंदर रायका यांनी आज रविवारी खानापूर आगार प्रमुखांना प्रत्यक्ष जाऊन भेटून खानापूरहुन संध्याकाळी 7.30 वाजता सुटणारी पारवाड वस्तीची बस व डोंगरगाव बस त्वरित सुरू करा अशी सक्त सूचना केली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी गुंडू तोपीनकट्टी, सुनील नायक, प्रकाश निलजकर आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी आगार प्रमुखांना संध्याकाळी साडेसात वाजता वस्तीची बस जात नसल्याने खानापूर जांबोटी, कणकुंबी या मार्गावर असणाऱ्या आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना होणारा त्रास बस आगार प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच अबनाळी बस ही डोंगरगाव मार्गे करावी, असे सांगितले. भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आगार प्रमुखांनी येत्या 2 दिवसात खानापूर – पारवाड वस्तीची बस सुरू करतो असे आश्वासन दिले आहे. जर दोन दिवसात बस चालू झाली नाही तर पुढील परिणामाला आपण जबाबदार असाल, असे त्यांना सांगण्यात आले.