बेळगाव महानगरपालिकेकडून टिळकवाडीतील (आता अस्तित्वात नसलेल्या) कलामंदिर शेजारील दुकाने पाडल्यानंतर दुकानदारांना उद्या गुरुवार दि. 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आपापले सामान हलविण्याची सूचना देण्यात आली आहे. हा खरेतर महापालिकेचा उरफाटा कारभार आहे. कारण संबंधित दुकानदारांना 1993 साली झालेल्या काँग्रेस रोड रस्ता रुंदीकरणानंतर कलामंदिरशेजारी महापालिकेकडूनच अधिकृतरित्या पर्यायी जागा देण्यात आली होती. आता त्याच दुकानदारांना पुन्हा त्या जागेवरून हटविण्यात येत असल्यामुळे सध्या टिळकवाडीतील दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत .
टिळकवाडीतील साहित्यिक सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे केंद्र असणाऱ्या कलामंदिरच्या ठिकाणी बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन भव्य शॉपिंग मॉल उभारण्यात येत आहे. बदलत्या काळानुसार ही संकल्पना स्तुती असली तरी सध्या जी प्रक्रिया राबवली जात आहे त्यामध्ये एखाद्या मेलेल्याला पुन्हा फासावर लटकवणे असा प्रकार घडत आहे. बेळगावात पहिल्यांदा तत्कालीन मनपा आयुक्त बारी नवाब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस रोडवर रस्ता रुंदीकरणाची संकल्पना राबविण्यात आली.
त्यावेळी काँग्रेस रोड रुंदीकरणात आपली दुकाने गमवलेल्यांना 1993 साली कलामंदिर शेजारी दुकानांसाठी जागा देण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया अधिकृतरित्या झाली असताना आता कलामंदिरच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या मॉलसाठी संबंधित दुकानदारांना पुन्हा रस्त्यावर आणण्याचा प्रकार बेळगाव महानगरपालिकेकडून केला जात आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे संबंधित दुकानदारांवर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली आहे.
कलामंदिर परिसरात सध्या हटविण्यात आलेल्या दुकानांचे मालक आणि व्यापारी हे फार पूर्वीपासून आपला व्यवसाय टिळकवाडी परिसरात करत आहेत. त्यामुळे टिळकवाडी परिसरात त्यांच्याबाबत विश्वासहर्ता आहे. या सर्वसामान्य दुकानदारांना महापालिकेकडून वारंवार मनस्ताप दिला जातो. आता तर महापालिकेने कहर करताना 1993 साली स्वतःच मंजूर केलेली कलामंदिर शेजारील दुकाने जमीनदोस्त केली आहेत. सखेद आश्चर्य याचे आहे की चक्क दुकान पाडण्यात आल्यानंतर संबंधित दुकानदारांना आपापले सामान हलवण्याचा आदेश देण्यात आला आहे. थोडक्यात प्रथम नुकसान करायचे आणि नंतर सहानुभूती दाखवायची. महापालिकेच्या या उरफाट्या कारभारामुळे कलामंदिर शेजारी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगावला स्मार्ट सिटी बनवा यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य आहे मात्र आम्हाला भिकेला लावू नका, अशी कलामंदिर शेजारील हटवण्यात आलेल्या दुकानांच्या मालकांची मागणी आहे. दरम्यान, कलामंदिरच्या आसपासचे दुकानदार आणि व्यवसायिक हे स्थानिक आहेत, त्यांच्यावर आमचा पुर्ण विश्वास आहे, तेंव्हा त्यांना संबंधित ठिकाणावरून हलवण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.