कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात लॉक डाऊन करण्यात आला असला तरी याचा गैरफायदा जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून घेतला जात आहे. दाम दुप्पट दराने वस्तूंची विक्री करणाऱ्या या दुकानदारांवर त्वरित कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
शहरातील प्रमुख्याने उज्वल नगर गांधी नगर वडगाव आदी उपनगर भागात परिसरामधील कांही धान्य आणि किराणामालाचे दुकानदार लाॅक डाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची लुबाडणूक करताना दिसत आहेत. या ठिकाणचे काही दुकानदार तांदूळ डाळ खाद्यातील या जीवनावश्यक वस्तूंची मनमानी दराने विक्री करत आहेत. बाजारात जे 25 किलो तांदळाचे पोते 650 ते 700 रुपयांना मिळते, त्याची विक्री हे दुकानदार 1050 ते 1100 रुपये इतक्या दराने करत आहेत. खाद्यतेल आणि मसूर, मुग आदी डाळींच्या बाबतीतही हाच प्रकार घडत आहे. खाद्यतेल जे 70 ते 80 रुपये किलो इतकी आहे, ते 10 – 20 रुपये जादा दर आकारुन विकले जात आहे.
“लोक डाऊन”ला सामोरे जाणाऱ्या जनतेला जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू लागली आहे, तर दुसरीकडे किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेते सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांना सध्या कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंची गरज भासते आहे. नागरिकांच्या या असहाय्यतेचा फायदा किराणा दुकानदार आणि धान्य दुकानदार उठवत असून दाम दुप्पट दराने त्यांनी जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्यांची विक्री चालवली आहे.
त्याच प्रमाणे भाजी विक्रेत्यांनी सुद्धा सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे. किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांच्या या लुटारू वृत्तीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले असून त्यांच्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तरी प्रशासनाने या प्रकरणी त्वरित लक्ष घालून संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.