सावर्डे (ता. चिपळूण) येथील डेरवणमधील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत आणि एस व्ही सिटी स्पोर्ट्स अकादमी आयोजित आंतरराज्य निमंत्रितांच्या 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद बेळगावच्या विजया फुटबॉल अकादमी संघाने हस्तगत केले आहे.
डेरवण येथील मैदानावर झालेल्या या आंतरराज्य स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रारंभी विजया अकादमीने प्रतिस्पर्धी चिपळूणच्या एपीएम इंग्रजी माध्यम शाळेच्या संघावर 4 – 0 अशा गोलफरकाने एकतर्फी विजय मिळवला. विजया संघातर्फे स्पर्श देसाई आणि रेहान किल्लेदार यांनी प्रत्येकी दोन गोल केले. दुसऱ्या सामन्यात विजया अकादमीने प्रतिस्पर्धी मुंबई बांद्रा सेंट्रल स्कूल संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या चुरशीच्या सामन्यात विजया अकादमी संघाने प्रतिस्पर्धी तुल्यबळ मुंबईच्या लीडर्स फुटबॉल अकादमी संघावर 2 – 1 असा निसटता विजय संपादन केला.
उपांत्यफेरीत विजया फुटबॉल अकादमी संघाने प्रतिस्पर्धी मुंबई बांद्र्याच्या सेंट अँड्र्यूज स्कूल संघावर 3 – 0 असा एकतर्फी विजय मिळवला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजया फुटबॉल अकादमी संघाची गाठ माजी विजेत्या गडहिंग्लज युनायटेड संघाशी पडली. या सामन्यात कर्णधार आयान किल्लेदार व रेहान किल्लेदार यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर विजया अकादमी संघाने तुल्यबळ गडहिंग्लज युनायटेड संघावर 2 – 0 असा शानदार विजय मिळवून जेतेपद हस्तगत केले.
विजया फुटबॉल अकादमी संघात आयान किल्लेदार (कर्णधार), रेहान किल्लेदार, ऋषिकेश गोदवानी, रिहान बेपारी, मसूद मुजावर, प्रथमेश खटावकर, सौरभ हलगेकर, सर्वेश साबळे, सुफियान चौधरी, विनायक भावी, फुलकान बेपारी, रिहान मुल्ला, आर्या गायकवाड, माझ कुडची व जयदेव सुळगेकर यांचा समावेश होता. या संघाला फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट, मानस नायक आणि संघ व्यवस्थापक सलीम किल्लेदार यांचे मार्गदर्शन लाभले. विजया अकादमीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील, डॉ. रवी पाटील आणि मिलिंद चव्हाण यांचे या संघाला प्रोत्साहन लाभत आहे.