कधी दुष्काळ तर कधी पूर आणि कधी अवकाळी अशा परिस्थितीत संकटाने मेटाकुटीला आलेल्या शेतकरीला आता बोगस बियाणांमुळे त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने बियाणे तपासणी करूनच ती शेतकऱ्यांना वितरित करण्याची गरज असते. मात्र काही कंपन्या बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
शासकिय प्रयोग शाळेत तब्बल पंधरा हजारांहून अधिक बियाणांची नमुने अप्रमाणित असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे विविध कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे आढळून येत असले तरी कृषी विभागाने मात्र याकडे कानाडोळा केला आहे. या कंपन्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्या थोड्याशा जमिनीत शेतकरी या बियांची लागवड करीत आहेत. तीन महिन्यानंतरही पीक न आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हा प्रकार अनेकांची डोकेदुखी ठरू लागला आहे. काबाडकष्ट करून जमिनीत घाम गाळून शेतकरी या बियांच्या आशेवर जुगार खेळत असतो. मात्र सध्या बोगस बियाणांमुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे कृषी खात्याने आता याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
बोगस बियाणे आणि औषधांबाबत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी घडत आहेत. मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित कंपन्यांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा बियाणांमुळे एकीकडे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडू लागले आहेत. तर दुसरीकडे कृषी विभागाने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे असे प्रकार निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.