मुलांना तणावमुक्त परीक्षा देता याव्यात यासाठी टिळकवाडी येथील संस्कृती एज्युकेअर संस्थेतर्फे आयोजित 21 दिवसांच्या ध्यानधारणा शिबिराची नुकतीच यशस्वी सांगता झाली.
देशमुख रोड, टिळकवाडी येथील पंचवटी प्लाझाच्या सभागृहात गेल्या 9 फेब्रुवारीपासून सदर शालेय मुलांसाठीच्या या ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिर वजा कार्यशाळेमध्ये 40 हून अधिक मुला – मुलींनी भाग घेतला होता. पहिल्या दिवसापासूनच शिबिरात उत्साही वातावरण असल्यामुळे 21 दिवसात मुलांनी एकही वर्ग चुकविला नाही. पालक देखील आपल्या मुलांना तनावमुक्ति चे महत्व पटवून देऊन त्यांना शिबिरासाठी घेऊन येत होते. सदर शिबिरात ध्यानधारणेत बरोबरच मेमरी गेम्स, म्युझिक थेरपी, मुलांना सकारात्मक मार्गदर्शन, कांही योगासने, ओंकाराचा जप आदी बाबींचा समावेश होता.
संस्कृती एज्युकेअरच्या या शिबिराच्या समाप्तीनंतर शिबिरार्थी मुले परीक्षेच्या ताणतणावातून मुक्त झाल्याचे आणि ताजेतवाने होऊन आत्मविश्वासाने वावरत असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे पालकवर्गानेही या शिबिराची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शिबिरातील ध्यानधारणा आणि योगासन वगैरेमुळे मुलांच्या भविष्यावर चांगला परिणाम होणार असल्याची प्रतिक्रियाही पालकवर्गांमध्ये व्यक्त होताना दिसत होती. गेल्या शनिवारी समाप्त झालेल्या या शिबिरात संस्कृती एज्युकेअरचे प्रमुख तेजस कोळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिरार्थी मुलांना मार्गदर्शन केले. आता मुलांच्या मातांसाठी पुढील महिन्यात अशाच पद्धतीचे शिबिर आयोजित करण्याची संस्कृती एज्युकेअरची योजना असल्याचे खासगी प्रशिक्षक, शिक्षक आणि समुपदेशक तेजस कोळेकर यांनी सांगितले.