बेळगाव आणि कारवार जिल्ह्याचे भौगोलिक स्थान व व्याप्ती लक्षात घेऊन याठिकाणी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा स्थापण्याच्या माजी महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी राज्य सरकारकडे केलेल्या मागणीला यश आले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. सुधाकर यांनी अल्पावधीत बेळगावसह कारवारमध्ये अत्याधुनिक कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा स्थापण्याचे आश्वासन नुकतेच दिले आहे.
बेळगाव जिल्ह्यात अद्याप कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसला तरी संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या वैद्यकीय नमुन्यांच्या तपासणीसाठी परगावच्या प्रयोगशाळांवर विसंबून राहावे लागत आहे. परिणामी संशयितांचा रिपोर्ट मिळण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे बेळगाव व कारवार जिल्ह्यात प्रयोगशाळा झाल्यास ती सर्वांसाठी सोयीचे ठरणार असल्याचे माजी मंत्री देशपांडे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.
यासंदर्भात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. सुधाकर यांनी लवकरच बेळगावात आधुनिक प्रयोगशाळा सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली तसेच कारवार येथे प्रयोगशाळेसाठी जागेची पाहणी केली जात असल्याची माहितीही दिली दरम्यान देशव्यापी लोकंच या पार्श्वभूमीवर तळागाळातील गोरगरिबांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. तेंव्हा त्यांच्या नजीक वास्तव्यास असणाऱ्या लोकांनी त्यांना आपल्यापरीने मदत करावी तसेच मुख्यमंत्री सहाय्य निधीत आपले योगदान द्यावे असे आवाहन माजी महसूल मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी केले आहे.