ड्रायव्हींग स्कुल चालवणे म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असाच समज आहे पण स्नेहल अनंत सावंत यांनी या समजाला छेद दिला आहे.आनंद मोटार ड्रायव्हिंग स्कुलच्या त्या संचालिका आहेत.
2000 मध्ये त्यांनी आपले पती अनंत यांच्या समवेत तरुणी आणि महिलांना कार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.त्यांचे पती अनंत यांचे 2007 साली अचानक निधन झाले आणि स्नेहल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.घरची जबाबदारी आणि मुलाचा सांभाळ अशी जबाबदारी त्यांच्यावर आली.आता पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता पण स्नेहल यांनी ड्रायव्हिंग स्कुलची धुरा सांभाळण्याचा निर्धार केला.अनेक अडचणी होत्या,अनेकांचा विरोध होता,त्रास देणारे लोक होते पण जिद्दीने स्नेहल यांनी ड्रायव्हिंग स्कुल चालवण्याचा निर्धार केला.अनेक चांगल्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला,मदत केली.त्यामुळे खंबीरपणे त्यांनी ड्रायव्हिंग स्कुलची जबाबदारी सांभाळली.
सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरू होतो.पहिली बॅच सकाळी सहाला सुरू होते .दुपारी जेवणासाठी त्या तासभर सुट्टी घेतात.नंतर रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचे कार चालविण्याचे ट्रेनिंग देणे सुरू असते.आजवर तीन हजारहून अधिक तरुणी आणि महिलांनी त्यांच्याकडून कार चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.दिवसभरात चाळीस जणांना त्या कार चालवण्याचे प्रशिक्षण देतात.
दिवसभर त्या बाहेरच असल्यामुळे त्यांच्या सासू सुनंदा आप्पासाहेब सावंत या घरची जबाबदारी सांभाळतात.मुलगा लहान असताना त्याची जबाबदारी सांभाळून घरचे इतर कामही सासूबाई करायच्या.माझ्या सासूबाईंनी मला खूप मदत करून धीरही दिला आहे असे स्नेहल सावंत सांगतात.
आज त्यांच्याकडे तीन कार असून एक इन्स्ट्रक्टर देखील कामाला आहे.कार चालवण्याचे ट्रेनिंग देण्या बरोबरच त्यांचे लायसन्स देखील त्या काढून देतात.शिकायला येणाऱ्या विवाहित महिलांची संख्या अधिक आहे.मुलगा शुभम याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे.
अन्य ड्रायव्हिंग स्कुलवाले देखील स्नेहल यांच्याकडे महिलांना पाठवतात.आर टी ओ ऑफिसमध्ये देखील सगळे सहकार्य करतात.महिलांनी आत्मविश्वास बाळगून स्वतःच्या पायावर उभे राहायला पाहिजे असे स्नेहल सावंत सांगतात.अनेक अडचणी,समस्या,विरोध याला तोंड देऊन ड्रायव्हिंग स्कुलची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या स्नेहल यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.