मित्रांनो हा तलाव नव्हे बरं का? हे आहे महाद्वार रोड क्रॉस नंबर 4 येथील खुल्या सखल भागात साचलेले पावसाचे पाणी. सदर तलाव सदृश्य साचलेल्या पाण्यामुळे सध्या संबंधित परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून महापालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव शहरात नुकतीच वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे महाद्वार रोड क्रॉस नं. 4 येथील खुल्या सखल भागात पाणी साचले आहे. सदर पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साचले आहे की नवागतास प्रथम दर्शनी पाहताना याठिकाणी तलावाचा आहे की काय? असे वाटते. शहरात वळीव पावसाने हजेरी लावल्यानंतर आता एक दिवस उलटून गेला तरी संबंधित सखल भागात साचलेले पाणी अद्यापही ओसरलेले नाही. या सखल भागाच्या चारही बाजूला पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्यामुळे गुरुवारपासून साचून राहिलेल्या या पावसाच्या पाण्यात केरकचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे.
या दुर्गंधीमुळे सध्या महाद्वार रोड क्रॉस क्रमांक 4 येथून ये-जा करणार्या नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. त्याचप्रमाणे सदर परिसरात डांस व माशांचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे नागरिकांच्या विशेषकरून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
सध्या कोरोना विषाणूचे संकट असताना आता या साचलेल्या पाण्यामुळे महाद्वार रोड क्रॉस नंबर 4 येथील नागरिकांच्या आरोग्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तरी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित साचलेल्या पाण्याची समस्या तात्काळ दूर करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.