कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्याचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी “कोरोना” संदर्भातील खबरदारीच्या उपाययोजनांची आज शुक्रवारी पाहणी केली.
जगभरात प्राणघातक कोरोना व्हायरसने आपली दहशत निर्माण केली आहे. भारतातही करुणा चा प्रसार होऊ लागला असून बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद, जयपूर आदि ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने खबरदारीचे उपाय म्हणून सर्व ती उपायोजना अंमलात आणली आहे.
सांबरा विमानतळावर परगावाहून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोर वैद्यकीय तपासणी करण्याबरोबरच कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र आयसोलेटेड विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्याचे राजकीय सचीव शंकरगौडा पाटील यांनी आज शुक्रवारी कोरोना संदर्भात जिल्हा आरोग्य खात्याने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. जिल्हा रुग्णालयातील आयसोलेटेड विभागालाही त्यांनी भेट दिली.
बेळगाव जिल्ह्यात अद्यापर्यंत कोरोना विषाणूचा शिरकाव झालेला नाही. राज्य शासनातर्फे युद्धपातळीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलात आणल्याचा हा परिणाम आहे. शासनाकडून कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजनांसाठी आवश्यक सर्व त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तेंव्हा नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.यावेळी किरण जाधव ,शिवाजी सुंठकर आदी भाजप नेते उपस्थित होते.