कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर झाला असला तरी लोक वेगवेगळ्या कारणांसाठी आणि प्रामुख्याने खरेदीसाठी रस्त्यावर येत असल्याने बेळगाव पोलिसांवर टीका झाली. या टीकेने पोलीस उपायुक्त सीमा लाटकर या कमालीच्या दुखावल्या आहेत. सर्व तर्हेचे प्रयत्न करूनही आपल्याला बोलून घ्यावे लागते, तेंव्हा कृपा करून कोणालाही रस्त्यावर येण्यास परवानगी देऊ नका. लोक घरातच बसतील याची सर्वतोपरी काळजी घ्या, असा सूचनावजा आदेश उपायुक्त लाटकर यांनी पोलिसांना दिला आहे.
गुरुवारी संध्याकाळी पोलिसांना वॉकीटॉकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, शुक्रवारचा दिवस फार महत्त्वाचा असून त्यातही सकाळी 6.30 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे. लोक जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर आहेत आणि विक्रेतेही येत आहेत. शुक्रवारी कोणत्याही विक्रेत्याला रस्त्यावर बसण्यास परवानगी देऊ नका. ते आपल्या डोक्यावर भाजीची बुट्टी घेऊन अथवा हात गाडीवरून भाजी विक्री करू शकतील. कोणालाही परिस्थितीत त्यांना रस्त्यावर बसण्यास प्रतिबंध करा. याबाबतीत कोणतीही तडजोड करू नका, अशी सूचना पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी केली आहे.
जनतेच्या सुरक्षेबरोबरच आपल्याला आपलीही सुरक्षितता महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. कांही लोक विनाकारण औषध आणणे, पैशाची चणचण, कोणीतरी आजारी आहे अशी खोटी कारणे देऊन घराबाहेर पडण्याचे निमित्त शोधत आहेत. त्यांना कोणतीही मोकळीक देऊ नका. मात्र खरोखरच एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलला न्यायचे असेल किंवा तितकीच तातडीची आणीबाणीची परिस्थिती आहे, असे आढळून आल्यास पूर्ण चौकशी करून त्या व्यक्तींना त्यांना जिथे जायचे आहे तिथे जाण्यास परवानगी द्या. मात्र याबाबत परत-परत शहानिशा करा.
वाहतूक विभागाचे पोलिस उत्तम काम करत आहेत त्यांच्यासोबत खाकीवर्दीतील पोलिसही दिसू देत. गर्दीच्या ठिकाणी मॅपिंग करा, त्याचे फोटो मला पाठवा. व्हाट्सअप ग्रुपमध्ये सारखे अपडेट देत राहा. चार-पाच जण एकत्र राहा मात्र एकमेकात सामाजिक अंतर ठेवा. टिळकवाडी, हिंदवाडी, टीव्ही सेंटर आदी कोणत्याही परिसरात मॉर्निंगवाॅक करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करा. त्यांना घराबाहेर पडू देऊ नका, अशा सूचना देखील पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी केल्या आहेत.