बेळगाव वनखात्याच्या कार्यालयासमोरील अर्धवट अवस्थेतील गटारांचे बांधकाम पादचारी आणि वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. याठिकाणी एखादी दुर्घटना करण्यापूर्वी येथील गटारीचे बांधकाम युद्धपातळीवर व्यवस्थित पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकानजीक सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत भुयारी मार्गासह रस्ता, गटारी आदींचे काम सुरू आहे. येथून काही अंतरावर असणाऱ्या वनखात्याच्या कार्यालयासमोर भुयारी गटारे बांधण्यात आली आहेत. तथापि सदर गटारांचे काम व्यवस्थित पूर्ण करण्यात आलेले नाही. कांही ठिकाणी ही गटारे खुली असून त्याठिकाणी बांधकामाच्या लोखंडी सळ्या धोकादायकरीत्या बाहेर डोकावत आहेत.
मध्यवर्ती बस स्थानकाला जोडणाऱ्या या रस्त्यावर कायम रहदारी असते. याठिकाणी दारूच्या दुकानासह विविध दुकाने आणि हॉटेल्स आहेत. त्यामुळे दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत याठिकाणी वाहनांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. परिणामी रात्रीच्या वेळी अंधारात प्राणघातक लोखंडी सळ्या बाहेर डोकावणारा गटारीचा हा खुला भाग मृत्यूचा सापळा ठरू शकतो.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात हाती घेण्यात आलेल्या विकास कामांपैकी बहुतांश कामे अर्धवट आहेत. ही अर्धवट कामे नागरिकांच्या जीविताशी खेळ करणारी ठरत असल्याचे याआधी सिद्ध झाले आहे. यापूर्वी मंडोळी रोडवर रात्रीच्यावेळी अंधारात अंदाज न आल्यामुळे अर्धवट अवस्थेत असलेल्या गटारीमध्ये पडल्याने एका सायकलस्वाराचा बांधकामाच्या लोखंडी सळ्या शरीरात शिरून जागीच मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकानजीक अशाच प्रकारे एकाचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे शहरात एकूण तिघाजणांचा बळी गेला आहे.
या पार्श्वभूमीवर वनखात्याच्या कार्यालयासमोरील गटारे आता मृत्यूचा सापळा बनू पाहत आहेत. तेंव्हा बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन खुले पडलेले अर्धवट अवस्थेतील गटारीचे बांधकाम त्वरित व्यवस्थित पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.