बेळगाव महानगरपालिका आणि दालमिया सिमेंट कंपनी यांच्यात सामंजस्याचा करार झाला असून त्यानुसार दालमिया कंपनी टाकाऊ प्लास्टिक कचऱ्याची उचल करून कोळशा ऐवजी इंधन म्हणून पक्क्या भाजक्या विटा तयार करण्यासाठी त्याचा वापर करणार आहे.
दालमिया सिमेंटचा यादवाड (ता. गोकाक) येथे औद्योगिक प्रकल्प असून अलीकडेच त्यांनी महापालिकेने पुनर्वापर न केलेल्या 120 टन प्लॅस्टिक कचऱ्याची उचल केली होती. स्वतःच्या फॅक्टरी कोळशा ऐवजी प्लास्टिकचा वापर करणारी यंत्रणा बसून घेतल्याने दालमिया सिमेंट प्लास्टिक कचऱ्याची खरेदी करत आहे. सदर कंपनीने प्लास्टिक जाळल्यानंतर हवेत घातक उत्सर्जन होऊन वातावरण प्रदूषित होत नाही ना? यावर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ देखरेख ठेवून आहे.
प्लास्टिक कचऱ्याच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध गावांत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन दिले जात आहे. घराघरातून गोळा केलेले पुनर्वापर करताना न येणारे प्लास्टिक दालमिया सिमेंट फॅक्टरीत पक्क्या भाजलेल्या विटा तयार करण्यासाठी परिणामकारकरित्या नष्ट केले जाणार आहे.
यामुळे प्लास्टिक कचरा डेपोवरील भार कमी होणार असून डेपोसाठी जागाही कमी लागणार आहे. अलीकडे कच्चामाल आणि इंधनाला पर्याय म्हणून औद्योगिक प्रक्रियेमध्ये टाकाऊ साहित्याचा वापर केला जात आहे. सिमेंटच्या भट्टीमधील अतिउच्च तपमानामुळे विविध प्रकारचा कचरा कोणत्याही घातक उत्सर्ग शिवाय प्रभावीरीत्या नष्ट करता येतो.