सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण गतिमान झाला आहे. निवांतपणा एकांत हा तसा दुर्मिळ झाला आहे. धावपळीमुळे खाण्यापिण्याकडे आणि व्यक्तिगत आरोग्याकडे दुर्लक्ष हे स्वाभाविकपणे आलेच. मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे गेल्या चार-पाच दिवसात या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन एकांतात राहण्याची वेळ नियतीने माणसावर आणली आहे. बैचेन झालेल्या मनुष्याला आता टीव्ही, पत्ते, कॅरम, पुस्तके हेच काय ते सोबती आहेत.
सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जगण्याची धडपड व धावपळ दिसते. मनुष्य अशा सवयींचा गुलाम झाला की त्याला निसर्गाने लादलेला सक्तीचा एकांतवास देखील सहन होत नाही. गेल्या चार-पाच दिवसात शहरवासीय घरात बसून आहेत संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. घरात बसायचे म्हणजे किती तास? झोपायचे म्हणजे तरी किती तास? एक दोन तास अथवा एक दोन दिवस ठीक आहे. तथापि कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे त्यांच्यावर ही सक्ती 21 दिवसांसाठी अपरिहार्य आहे. सध्या चार-पाच दिवसातच माणसे कंटाळली आहेत.
दिवसभर काय करायचे हा त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे अनेकांनी घरातील टीव्ही, पुस्तके, कॅरम, पत्ते, सापशिडी आदींचा आधार घेतला आहे. लहान मुले व तरुण मंडळी स्मार्टफोनवरील गेम खेळण्याचा आनंद घेत आहेत. सॉफ्टवेअर अथवा मल्टिनॅशनल कंपनीत काम करणारी युवा पिढी घरातून ऑनलाईन काम करत आहे. हा सर्व कारभार एकत्र कुटुंबात बसून घरातील मंडळी करीत आहेत. पुरुष मंडळी आपल्या कामात व्यस्त असली तरी स्वयंपाक घरातील धांदल कांही बंद झालेले नाही. उलट संपूर्ण कुटुंब एकत्र असल्यामुळे गृहिणींवरील ताण वाढल्याचे दिसत आहे.
मानवजातीवर येणारे प्रत्येक संकट कांही ना कांही शिकवून जातं असं म्हणतात. सध्याची एकंदर परिस्थिती पाहता धावपळ टाळा, प्रदूषण टाळा, आरोग्य सांभाळा, खाण्यापिण्यातील पथ्य पाळा असा जणू संदेशच कोरोना विषाणूच्या स्वरूपातील संकटाने नागरिकांना दिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.