कोरोना व्हायरस अर्थात कोरोना विषाणूच्या भीतीने कोंबड्यांचे आणि पर्यायाने चिकनचे दर घसरले आहेत, तथापि वस्तुस्थिती ही आहे की कोरोना व्हायरस आणि कोंबड्या यांचा काहीही संबंध नाही. हा उपद्रवी लोकांचा शेतकऱ्यांना संपवण्याचा कुटील डाव आहे, असा आरोप कर्नाटक को-ऑपरेटिव्ह पोल्ट्री फेडरेशन लिमिटेडच्या बेळगाव प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. आनंद पाटील यांनी केला आहे.
अंडी आणि ब्रॉयलर चिकनमुळे ग्राहकांना धोका निर्माण होण्याऐवजी त्यांचे पोषण होते. कोरोना व्हायरस हा “मानवी रोग” असून जो मनुष्याकडून मनुष्याकडे संक्रमित होतो. “बर्ड फ्लू” प्रमाणे “कोरोना” हा प्राण्यामुळे माणसाला होणारा रोग नाही. बर्ड फ्लू हा रोग प्राण्याकडून माणसात संक्रमित होतो, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. देशातील दरवर्षी 8 ते 10 टक्के आणि वाढणाऱ्या पोल्ट्री व्यवसायावर गेल्या 10 वर्षात अनेक हल्ले झाले आहेत. भारत हा जगामध्ये अंडी उत्पादनात तिसऱ्या आणि ब्रॉयलर उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा देश असून येत्या 2030 पर्यंत तो जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीने शरीराच्या आवश्यक पोषणासाठी दरवर्षी किमान 180 अंडी आणि 11.5 किलो ब्रॉयलर चिकन खाल्ले पाहिजे. तथापि सध्या खास करून सोशल मीडियावर कांही चुकीचा संदेश देऊन पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान केले जात आहे. चिकनमुळे कोरोना व्हायरस मनुष्यात संक्रमित झाला असल्याचे आजतागायत जगात एकही वृत्त नाही, अशी माहिती डॉ. आनंद पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या अफवा शेतकऱ्यांना संपवण्यासाठी असल्याच्या आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना डॉ. पाटील म्हणाले की ब्रॉयलर चिकनची पूर्ण वाढ (सरासरी 2 किलो वजनाची) होण्यास 40 दिवस लागतात पोल्ट्री व्यवसायात एकूण खर्चापैकी सर्वाधिक खर्च म्हणजे सुमारे 70 टक्के खर्च कोंबड्यांच्या खाद्यावर करावा लागतो. मका हे कोंबड्यांचे मुख्य खाद्य असून पूर्वी मका 12 रुपये प्रति किलो मिळत होता जो आता 25 रुपये प्रति किलो इतका महाग झाला आहे. याचा अर्थ शेतकरीदेखील पोल्ट्री व्यवसायावर अवलंबून आहे.
पूर्ण वाढ झालेल्या चिकनचा उत्पादन खर्च 75 रुपये प्रति किलो इतका आहे. मात्र आता कोरोनाच्या अफवांमुळे चिकनचा दर प्रचंड घसरला आहे. ज्यामुळे पोल्ट्री मालकांना आपला व्यवसाय चालविणे परवडेणासे झाले आहे. यासाठी पोल्ट्री चालक एक तर कोंबड्यांना मारून टाकत आहेत किंवा स्वस्तात अथवा मोफत विकून टाकत आहेत, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
कोणत्याही व्हायरस अर्थात विषाणूवर उपचार करता येत नाहीत परंतु त्याचे घातक परिणाम औषधांद्वारे सौम्य करता येतात. याखेरीज औषधामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवून रुग्ण बरा होण्यास मदत मिळते. अंडी आणि ब्रॉयलर चिकन खाल्ल्याने शरीराचे पोषण होऊन प्रतिकारशक्ती वाढते. यासाठीच त्यांना रोग फैलावणारे नव्हे, तर औषधी समजले जाते असेही डॉ. आनंद पाटील यांनी शेवटी सांगितले.