शहरातील फेसबूक फ्रेंडस् सर्कलतर्फे केएसआरटीसी बेळगाव बस आगारांमध्ये रविवारी सायंकाळी कोरोना विषाणू प्रादुर्भाव संदर्भात आयोजित जागृती कार्यक्रम उत्तम प्रतिसादात पार पडला.
केएलई हॉस्पिटलचे फिजिशियन आणि जे. एन. मेडिकल कॉलेजमधील लेक्चरर डॉ. माधव प्रभू यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या फेसबुक फ्रेंडस् सर्कलतर्फे आज रविवारी सायंकाळी 5.30 ते 6.30 या कालावधीत कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. कर्नाटक वायव्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बेळगाव बस आगारामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आगारातील बसचालक, वाहक, मॅकेनिक आदी कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूबाबत माहिती देण्यात येऊन घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना सॅव्हलाॅन हँड वॉशची प्रत्येकी 10 जम्बो पॅकेट्स आणि संतूर हँड वाॅशचे वितरण करण्यात आले.
परिवहन मंडळाचे बस चालक आणि वाहकांनी तसेच मेकॅनिक्सनी आपल्या दुरुस्तीच्या कामानंतर आपले हात स्वच्छ धुवावेत यासाठी सदर हँडवॉशचे वाटप केले गेले. याप्रसंगी केएसआरटीसीचे पी. एफ. जतगोंडा, एस. एन. सत्यावरमठ, एस. एस. कोरे, पी. एच. कुलकर्णी, डी. एन. कांबळे आदींसह चालक-वाहक आणि मेकॅनिक उपस्थित होते. सदर उपक्रमांमध्ये फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, शहाबुद्दीन बॉम्बेवाले, दिनेश प्रभू, राजेंद्र अनगोळकर आदींचा सहभाग होता.