कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बेळगाव बस आगाराला गेल्या आठवड्याभरात प्रतिदिन 10 ते 15 लाख रुपये इतका तोटा सहन करावा लागत असून परगावच्या तिकीट आरक्षणाचे प्रमाण तब्बल 90 टक्के इतके घटले आहे.
केएसआरटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे गेल्या आठवड्याभरापासून प्रवाशांनी केएसआरटीसीच्या बस गाड्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे संस्थेच्या उत्पन्नात प्रतिदिन 10 ते 15 लाख रुपयांची घट होत आहे. त्याचप्रमाणे परगावच्या तिकीट आरक्षणाचे प्रमाणही 90 टक्के इतके घसरले आहे.
राज्य शासन आणि आरोग्य खात्याच्या आदेशानुसार राज्य परिवहन मंडळाच्या बेळगाव आगाराकडून कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रादुर्भावास संदर्भातील सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.
बेळगाव बस आगारामध्ये शहर आणि परगावात सेवा देणाऱ्या बसगाड्या फिनेल व डेटॉल ही जंतुनाशके टाकून रोजच्या रोज स्वच्छ धुतल्या जात आहेत. परिवहन मंडळाच्या बसवाहक, चालक आदी कर्मचाऱ्यांमध्ये करुणा बाबत जागृती करण्यात आली असून त्यांना मास्क पुरवण्यात आले आहेत. बस स्थानकांवर ध्वनिक्षेपकद्वारे कोरोनाबाबत जनजागृती देखील केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.