लाॅक डाऊनच्या काळात सर्वात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे ती स्थलांतरितांची. यामध्ये आपले गांव सोडून विविध ठिकाणी गेलेले मजूर किंवा ऊसतोडणी कामगार या सर्वांचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोक डाऊनमुळे हे सर्वजण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यावर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलताना स्थलांतरितांसाठी तात्काळ निवासाची सोय करावी, असा आदेश राज्यातील बेळगावसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बजावला असून त्यासाठी मार्गदर्शक प्रणालीही नमूद करून दिली आहे.
कर्नाटक राज्य सरकारचे मुख्य सचिव एन मंजुनाथ प्रसाद यांनी एका लेखीपत्राद्वारे उपरोक्त आदेश बजावला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कामगार विद्यार्थी आणि पर्यटकांच्या हालचालींवर बंदी घालण्याचे आदेश भारत सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. संबंधितांना त्यांच्या मूळ गावी अथवा परराज्यात जाण्यास जबरदस्ती करू नये अशी सक्त सूचना देण्यात आली आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलताना स्थलांतरितांसह बेघरांसाठी तात्काळ निवासाची सोय करावी, असा आदेश राज्यातील बेळगावसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बजावला असून त्यासाठी मार्गदर्शक प्रणालीही नमूद करून दिली आहे. स्थलांतरित मजूर व बेघरांसाठी तात्पुरती निवासाची सोय करण्याबरोबरच त्यांचे भोजन, कपडेलत्ते व औषध यांची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. प्रत्येक स्थलांतरित कुटुंबातील लोकांची संख्या व आधार क्रमांक घ्यावा. तसेच त्यांना नेमके कुठे जायचे आहे याची माहिती घेऊन ती माहिती त्यांना एकत्र ठेवताना उपयोगात आणावी.
लोक डाऊनमुळे सध्या राज्यातील सर्व हॉटेल्स व लॉज आरक्षित झाले आहेत. त्यामुळे स्थलांतरित मजूर व बेघरांसाठी पीजी हॉस्टेल्स, विद्यापीठांची हॉस्टेल्स, समुदाय भवन, मंगल कार्यालये, निवासी शाळा आदींचा शोध घ्यावा तसेच त्याठिकाणी आणि आंघोळीची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, वीजपुरवठा, मच्छरदानी, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत याची शहानिशा करावी. संबंधित ठिकाण स्वच्छ ठेवावे आणि त्याला कुलूप – किल्ली असेल याची दक्षता घ्यावी.
स्थलांतरित मजूर व बेघरांना सकाळचा नाष्टा व दोन वेळचे जेवण काय द्यायचे याचा मेनू ठरवला जावा. त्यासाठी भांडी व ताटवाट्या भाडेतत्त्वावर घ्याव्यात. मध्यवर्ती ठिकाणी सर्वांसाठी एकत्र अन्न शिजवले जावे. हे करताना सर्व परिसर कोरडा व ओला नसेल याची दक्षता घ्यावी. स्थलांतरित मजूर व बेघरांच्या निवासाच्या ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था केली जावी. सध्या परिस्थितीत उपरोक्त सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जावी आणि ज्या काही समस्या निर्माण होतील त्या वेळच्या वेळी यशस्वीरित्या हाताळल्या जाव्यात, असे मार्गदर्शक प्रणालीमध्ये नमूद करण्यात आले आहे.