Thursday, December 19, 2024

/

कोरोना विरुद्ध संघटित लढ्याची गरज – आमदार अनिल बेनके

 belgaum

गेल्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टी प्रसंगी बेळगाववासियांनी ज्या पद्धतीने जाती भेद विसरून संघटितपणे कार्य केले त्या पद्धतीने त्यांनी कोरोना विषाणूच्या विरोधात संघटित लढा द्यावा, असे आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी केले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावास संदर्भातील जनजागृती आणि त्या अनुषंगाने अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी महापालिका हद्दीतील पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांसह सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी तसेच जे जे यासंदर्भात कार्य करत आहेत त्या सर्वांची बैठक आज सोमवारी आमदार अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर बेळगाव लाइव्ह शी बोलताना आमदार बेनके यांनी उपरोक्त आवाहन केले. आमदार अनिल बेनके म्हणाले, गेल्या सहा महिन्यापूर्वी बेळगावसह परिसरात आजपर्यंत झाला नव्हता इतका मुसळधार पाऊस झाला त्यावेळी बेळगाव करांनी जाती भाषा भेद विसरून जसे संघटितपणे कार्य केले तसे कार्य आता कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी केले पाहिजे. अतिवृष्टीच्या काळात बेळगावकरांनी संघटितपणे कार्य केल्यामुळेच जीवित हानी झाली नाही. मालमत्तेचे ही फारसे नुकसान झाले नाही. आता आलेत आता देखील संघटित लढा दिल्यास आपण करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखू शकतो असे आमदारांनी सांगितले.

कोरोना बाबत लोकांमध्ये घबराट पसरेल असे काम कोणी करू नये. सध्या परिस्थिती अशी आहे की की एखाद्याला किरकोळ ताप आला आणि घरी डॉक्टर आले की गल्लीबोळात त्याची चर्चा सुरू होत आहे. अशाच चर्चेचे पर्यवसन किरकोळ सर्दी-पडसे झालेल्या एकाला गावाबाहेर घालण्याचा प्रकार कोन्नुर गावांमध्ये नुकताच घडला आहे तसे न होता जर एखाद्याला सर्दी ताप अथवा डोकेदुखी असेल तर डॉक्टर आणि अथवा कोरोनाबाबत जनजागृती करणाऱ्यांनी संबंधित रुग्णाला समजावून सांगावे आणि काहीही संशयास्पद वाटले तर त्याला हॉस्पिटलमध्ये आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवावे तसेच सरकार तर्फे हे त्या रुग्णाची देखभाल केली जावी त्याची जास्तीत जास्त चर्चा होणार नाही याची खबरदारी घेतली जावी. कारण चर्चा झाली की कोन्नुरप्रमाणे संबंधित रुग्णाला गल्लीबाहेर अथवा गावाबाहेर घालण्याचा प्रकार बेळगावात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी सूचना आपण बैठकीत दिली असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली.

Mla benke review meeting
Mla benke review meetingcity corporation

कोरोना विषाणू संदर्भातील जनजागृती कार्यक्रमात सहभागी लोकांनी आपल्याला नेमून दिलेले जागृतीचे कार्य करावे कोणावरही उपचार करण्यात जाऊ नये अशी सक्त सूचना आपण दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारी संदर्भातील जनजागृतीसाठी आता शहरात दररोज सकाळी कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा वापर केला जाणार आहे. या गाड्यांचा सोबत आणखीन एक वाहन स्पीकरद्वारे कन्नड आणि मराठीतून नागरिकांमध्ये जनजागृती करेल असे आमदार बेनके यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या दहशतीचा गैरफायदा घेत काही मेडिकल दुकानदार अव्वाच्या सव्वा किमतीने तोंडाला लावण्याचे मास्क विकत आहेत. याचीही नोंद आजच्या बैठकीत घेण्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणालाही मास्क मिळणार नाही त्याची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे मास्कच्या काळ या बाजाराला आळा बसणार आहे. मास्कसंदर्भात बोलताना आमदार बेनके म्हणाले की, सरसकट सर्वांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. ज्यांना ताप सर्दी खोकला आहे त्यांनी मास्क वापरावा अथवा डॉक्टरांच्या सल्ल्यावरून मास्क वापरावा. तसेच कोरोना लागण होण्याची शक्यता असणाऱ्या हॉस्पिटल, दवाखाने अशा ठिकाणी जाताना मात्र सक्तीने मास्क परिधान करावा असेही त्यांनी सांगितले.

आपण स्वतः बुधवारपासून घरोघरी जाऊन कोरोनाबाबत जनजागृती करणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले त्याच प्रमाणे महापालिकेच्या सर्व स्वच्छता कामगारांना मास्क आणि ग्लाऊज देण्याबरोबरच त्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.