धामणे (ता. जि. बेळगाव) येथील श्री कलमेश्वर शेतकरी संघटनेतर्फे खास बसवेश्वर यात्रेनिमित्त खाली गाडा एका बैलजोडीने पळविण्याची जंगी शर्यत शुक्रवारी सायंकाळी यशस्वीरित्या पार पडली. या शर्यतीचे विजेतेपद श्री चव्हाटा प्रसन्न, कुप्पटगिरी या बैलजोडीने पटकाविले.
धामणी येथे शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बुडवी यांच्या अध्यक्षतेखाली सदर शर्यतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. त्यानंतर दिवसभर सायंकाळी उशिरापर्यंत ही शर्यत घेण्यात आली. या शर्यतीत श्री चव्हाटा प्रसन्न कुप्पटगिरी या बैलजोडीने सर्वाधिक 2,041 फुट गाडा पळवून प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामागोमाग मंजुनाथ कट्टी, नवलूर – धारवाड यांच्या बैलजोडीने दुसरा (2018 फूट) आणि शिवाजी मल्लेशी कणबरकर मुतगा यांच्या बैलजोडीने तिसरा क्रमांक (2015 फूट) मिळविला.
चव्हाटा प्रसन्न वाघवडे (1999 फूट), सोमेश्वर प्रसन्न चिक्कबागेवाडी (1996 फूट), नारायण कार्वेकर मोदेकोप्प (1987 फूट), कलमेश्वर प्रसन्न धामणे, रवळनाथ प्रसन्न कर्ले, जिनेश्वर बसवेश्वर प्रसन्न हिरेहट्टीहोळी आणि सिद्धेश्वर मोदगा हे अनुक्रमे शर्यतीतील पहिले चार ते दहा क्रमांकाचे विजेते ठरले.
सदर शर्यतीतील विजेत्या श्री चव्हाटा प्रसन्न, कुप्पटगिरी या बैलजोडी मालकास बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर पुरस्कृत 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. त्याचप्रमाणे अन्य नऊ क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 21 हजार रुपये, 18 हजार रु., 16 हजार रु., 14 हजार रु., 12 हजार रु. आणि 10 हजार रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात आली. या शर्यतीसाठी एकूण 16 रोख बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली होती. शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे रमेश गोरल, कोमण्णा कोमाण्णाचे, माजी ग्रा. पं. अध्यक्ष मारुती मरगानाचे आदींसह अन्य मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
शर्यतीसाठी रमेश कोमाणाचे, सुरेश मायाण्णाचे, यल्लाप्पा मजुकर, भरमा गोमाजी, कृष्णा जायण्णाचे, परशराम मरगाणाचे आदींनी पंच म्हणून तर सागर खनाजी यांनी टाइम कीपर म्हणून काम पाहिले. सदर शर्यत यशस्वी करण्यासाठी शर्यत कमिटीचे अध्यक्ष कोमाण्णा कोमाण्णाचे यांच्यासह श्री कलमेश्वर शेतकरी संघटना, धामणे ग्रामस्थ आणि तरुण युवक मंडळ, धामणे यांनी विशेष परिश्रम घेतले.