पोटाला सहा मुली आणि एक मुलगा आला. कसाबसा मोठ्या कुटुंबात टिकाव लागायचा असेल तर आपण काहीतरी केले पाहिजे.हे हलगाच्या भागीरथी चौगुले यांच्या लक्षात आले आणि त्यांनी फुलराणी बनायचे ठरवले.
बेळगावच्या गणपती गल्लीत सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत फुले आणि फुलांच्या माळा विकून तसेच आपल्या घरचा शेती व्यवसाय सांभाळून कष्टाने राबून खाणाऱ्या भागीरथीबाई चौगुले या खरोखरच महिलांसाठी आदर्श आहेत.
कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते हे त्यांच्या लक्षात आले. होलसेल बाजारात फुले खरेदी करून ती नागरिकांना विकायचा धंदा त्यांनी सुरु केला. सलग 20 वर्षे हे काम करून त्यांनी आपल्या मुलाबाळांचे कल्याण केलं. त्या मुलींची लग्न तर करून दिली मुलगाही कर्तबगार झाला आहे.
हलगा इथून पहाटे लवकर तयार होऊन बेळगावला दाखल होऊन त्यांनी सुरू केलेले काम अविरतपणे सुरू आहे. गणपत गल्लीत फुले घ्यायला जाणाऱ्या नागरिकांच्या भागीरथीबाई परिचयाच्या आहेत. समाजात वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात मात्र आपण काम करून कष्ट करून खाल्लं तर कोणाला आपल्याकडे बघून बोलण्याची टाप होणार नाही अशा प्रकारचा आदर्श त्यांनी निर्माण केला. तर शेतकरी कुटुंबातल्या भागीरथीबाई या साठ वर्षे वयाच्या आहेत .
शिक्षण जेमतेम आहे. मात्र आपल्या कुटुंबाला सावरायचे असेल तर आपण काम करायला हवे हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या आदर्श कामाला सलाम करताना आज शिक्षण घेऊन कोणतेही काम न करता वेगवेगळ्या अपेक्षा बाळगणाऱ्या महिलांनी बाहेर पडण्याची शिकवण देतात. आपल्याला जमेल ते काम करून कुटुंबाला संसाराला हातभार लावण्याची शिकवण भागीरथीबाई यांनी समाजाला दिली आहे. अश्या या भागीरथी यांच्या कार्यास बेळगाव live चा मानाचा सॅल्युट…