नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे बेळगावसह पांच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या हितासाठी आरोग्य तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रवाशांच्या हितरक्षणाबरोबरच त्यांचे रेल्वेस्थानकाबाबतचे मत अधिक चांगले व्हावे हा त्यामागील उद्देश असून या केंद्रांचे “पल्स अॅक्टिव्ह स्टेशन” असे नामकरण करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या आरोग्याच्या हितासाठी नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे बेळगाव, धारवाड, वास्को-द-गामा, बेळ्ळारी आणि होस्पेट या रेल्वे स्थानकांवर खास जागेत आरोग्य तपासणी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रामुळे प्रवाशांची तर सोय होणारच आहे, शिवाय रेल्वे भाड्या व्यतिरिक्त अतिरिक्त महसुलाची निर्मिती होणार आहे. यापूर्वी गेल्या जानेवारी महिन्यात हुबळी रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी केंद्राला प्रवाशांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन आता बेळगावसह एकुण पाच रेल्वेस्थानकावर “पल्स ॲक्टिव स्टेशन” नांवाने ओळखली जाणारी ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) या सारख्या अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज अशा या संगणकीकृत केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी बरोबरच सर्वसामान्य रोगांचे धोका निर्देशक आणि शरीराचे 21 मापदंड काढू शकणारी यंत्रणा उपलब्ध आहे. बॉडी पॅरामीटरमध्ये अर्थ शरीरिक मापदंड यामध्ये उंची, वजन, बीएमआय आदी तपासले जाईल, तर कार्डियाक हेल्थकेअर मीटरमध्ये रक्तदाब, एसपीओ 2 आणि नाडीपरीक्षा केली जाईल. त्याचप्रमाणे शरीर रचनेचे पृथक्करण करताना शरीरातील मेदाची टक्केवारी, खनिज व पाण्याचे प्रमाण, हाडांची ताकद आदी वैद्यकीय तपासण्या या ठिकाणी केल्या जातील. सर्वसामान्य रोगांच्या धोका निर्देशकांव्दारे मधुमेह, संधिवात, हृदयासंबंधीच्या तक्रारी आदींचे निदान केले जाईल. आरोग्य तपासणीच्या प्राथमिक चाचण्यांसह अन्य तपासण्यासाठी या केंद्रांमध्ये 50 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येईल. रुग्णांसाठी नेमकी कोण कोणती चाचणी आवश्यक आहे? त्यावर हे शुल्क ठरविले जाईल.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना आपल्या आरोग्य तपासणीकडे लक्ष देण्यास सवड नसते. बऱ्याचदा या ना त्या कारणाने आरोग्य तपासणी एक तर लांबणीवर पडते किंवा सातत्याने केली जात नाही. तेंव्हा रेल्वे स्थानकावरील या आरोग्य तपासणी केंद्रामुळे वेटिंग रूम अर्थात प्रतीक्षालयात थांबलेल्या प्रवाशांना त्यावेळेत आपली आरोग्य तपासणी करून घेता येणार आहे. तसेच त्यांना प्राथमिक आरोग्य तपासणीचा वैद्यकीय अहवाल तात्काळ प्राप्त होणार आहे. या अहवालात जर आरोग्याच्या बाबतीत एखादी गंभीर बाब आढळल्यास वेळीच त्याचे निदान झाल्यामुळे संबंधित व्यक्ती आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकते, असे नैऋत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक ए. के. सिंग यांनी सांगितले.