नव्या बेळगाव – धारवाड रेल्वेमार्गाला मिळाली मंजुरी : मुख्यमंत्र्यांनी केला राज्याचा अर्थसंकल्प जाहीर
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज गुरुवारी सादर केलेल्या राज्याच्या 2020 – 21 सालच्या अर्थसंकल्पात बेळगावच्या दृष्टिकोनातून कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये बेळगाव – धारवाड नियोजित रेल्वे मार्गास मंजुरी, मागासवर्गीय जाती-जमातीच्या बेरोजगारांना राज्य परिवहन मंडळातर्फे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि पीपीपी केंद्राची स्थापना यांचा मुख्यत्वेकरून समावेश आहे.
राज्यातील भाजप सरकारचा 2020 – 21 सालचा अर्थसंकल्प आज गुरुवारी मुख्यमंत्री बी एस. येडीयुरप्पा यांनी सादर केला. सदर अर्थसंकल्पात कित्तूरमार्गे बेळगाव – धारवाड रेल्वे मार्ग उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे सध्या असलेले बेळगाव – धारवाड दरम्यानच्या रेल्वे प्रवासाचे 121 कि. मी.चे अंतर तब्बल अवघे 73 कि. मी. इतके कमी होणार आहे. त्याचप्रमाणे प्रवासाचा कालावधी एक तासाने कमी होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून भारतीय रेल्वे मंत्रालयाला संबंधित रेल्वेमार्गासाठी आवश्यक जमीन मोफत दिली जाणार असून रेल्वेमार्ग उभारणीचा अर्धा खर्चही दिला जाणार आहे.
रेल्वे मार्गाप्रमाणे बेळगाव आणि कलबुर्गी विभाग राज्य परिवहन महामंडळाकडून मागासवर्गीय जाती-जमातीच्या स्त्री-पुरुष बेरोजगारांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावास यंदाच्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बेळगाव, हुबळी, मंगळूर, शिमोगा, हासन, तुमकुर आणि हरिहर येथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) सेंटर्स अर्थात सार्वजनिक खाजगी भागीदारी केंद्र स्थापण्यासाठी 353 कोटी रुपयांचे अनुदान अर्थसंकल्पाद्वारे मंजूर करण्यात आले आहे. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून राज्यातील युवा पिढीला औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. या उपक्रमाद्वारे येत्या पाच वर्षात 12,620 विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
बेळगावच्या हालगा गावानजीक असलेली सुवर्ण विधान सौधची इमारत अधिवेशनाचा काळ वगळता वर्षभर रिकामी पडून असते. मात्र आता अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार या रिकामी इमारतीचा उपयोग त्याठिकाणी काही सरकारी कार्यालय स्थलांतरित करण्याद्वारे केला जाणार आहे. दरम्यान कित्तूर मार्गे बेळगाव – धारवाड रेल्वेमार्ग उभारणीस मंजुरी मिळाल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.