स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण 350 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड व पोलीस खात्याच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अशोकनगर येथील कार्यालयामध्ये काल बुधवारी सदर बैठक पार पडली. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शहरातील पोलिस स्थानकांच्या शिफारशीवरून शहरातील विविध 350 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी साडेतीनशहे ठिकाणी कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावासह संबंधित ठिकाणांची यादी बैठकीत सादर केली. सदर प्रस्तावावर बैठकीत चर्चा होऊन पुन्हा एकदा पोलीस स्थानिकांकडून यादी घेऊन कॅमेऱ्यांची संख्या निश्चित करण्याचे ठरले. बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड करून हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून ते कमांड व कंट्रोल सेंटरशी जोडले जाणार आहेत.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्याचप्रमाणे पार्किंग व्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या कॅमेर्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी यावेळी सांगितले. कुरेर यांच्या माहितीला दुजोरा देऊन पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर पोलिसांचे लक्ष राहील असे स्पष्ट केले.
शहरातील ट्रॅफिक सिग्नल आणि मध्यवर्ती बस स्थानकासमोरील नियोजित भुयारी मार्ग याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यावेळी बोलताना पोलीस आयुक्त मुकेश कुमार यांनी शहरात पांच ठिकाणी इस स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची गरज व्यक्त केली. त्या पांच जागा पोलिस खात्याकडून निश्चित करून सांगितल्या जातील. तेंव्हा सीसीटीव्ही कॅमेराप्रमाणे ट्रॅफिक सिग्नल देखील स्मार्ट सिटी अंतर्गत बसवून देण्याची तयारी शशिधर कुरेर यांनी दाखविली. बैठकीस महापालिका आयुक्त के. एच. जगदीश, पोलीस उपायुक्त यशोधा वंटगोडी यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी आणि बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.