बसवन कुडची (ता. बेळगाव) येथील ग्रामदैवत श्री बसवेश्वर श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मदेव यात्रा महोत्सवाला आज शनिवारी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी इंगळ्याचे लाकूड आणण्याचा कार्यक्रम पार पडला.
बसवन कुडची येथील ग्रामदैवत श्री बसवेश्वर श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मदेव यात्रोत्सव आज शनिवार 14 मार्च पासून येत्या 25 मार्च 2020 पर्यंत चालणार असून 12 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने यात्रेच्या आज पहिल्या दिवशी इंगळ्याचे लाकूड आणण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बसवन कुडची आणि परिसरातील गावांमधून भगवे ध्वज लावलेल्या बैलगाड्याद्वारे इंगळ्याच्या लाकडाचे आज गावात सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले. या मिरवणुकीत सहभागी भगवे ध्वज लावलेल्या बैलगाड्या तसेच गुलाल उधळलेले आणि झूल पांघरलेले बैल साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.क
सदर यात्रोत्सवनिमित्त ग्रामदैवतांच्या मंदिर परिसरात पूजा साहित्यासह विविध खाद्यपदार्थ खेळणी आदींची दुकाने थाटण्यात आली आहेत. श्री बसवेश्वर श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मदेव यात्रा कमिटीने यात्रोत्सवाची जय्यत पूर्वतयारी केली आहे. दरम्यान आज इंगळ्याचे लाकूड आणण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आता सोमवारी 16 मार्च रोजी सकाळी देवाला रुद्राभिषेक आणि सायंकाळी आंबील गाड्यांची देवस्थानला प्रदक्षिणा, आंबील व घुगरी वाटप, गाडे पळविणे, शाहीर गाणे व पूजाविधी कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे 17 रोजी सकाळी पूजाविधी, सायंकाळी इंगळ्या आणि त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम होतील.
यात्रेच्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी म्हणजे 18 व 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य कुस्ती मैदान आयोजित केले जाणार आहे. यात्रेच्या शेवटच्या दिवशी बुधवार दि. 25 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त सकाळी देवांना अभिषेक घालण्याचा कार्यक्रम होईल. तसेच सायंकाळी 5 वाजता पंचांग पठण आणि बाल शिवाजी लाठी मंडळातर्फे लाठी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर करून करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातील. तरी भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बसवेश्वर श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मदेव यात्रोत्सव कमिटीने केले आहे.