आंबोलीत कारमध्ये जळालेली मृत महिला कार चालकाची पत्नी नसून कार चालक हा त्या महिलेचा फॅमिली डॉक्टर असल्याचे महिलेचा जावई आणि भावाने आंबोली येथे येऊन पोलिसांना माहिती दिली आहे.त्यामुळे हे प्रकरण नक्की काय आहे याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
बुधवारी आंबोली घाटात कारला आग लागून त्यामध्ये जळून ठार झालेली महिला ही त्या चालकाची पत्नी नसल्याचे उघड झाल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
मृत महिला ही बेळगाव-वैभवनगर येथील असून तिचे नाव रिझवाना इस्माईल पाथरवट (40) असे आहे. महिलेचा भाऊ आणि जावई आंबोली येथे पोचले असून त्यांच्याकडून अधिक माहिती पोलिसांना मिळाल्यावर या प्रकरणावर प्रकाश पडणार आहे.
महिलेसोबत असलेला दुंडाप्पा बंगारप्पा पद्मण्णावर (43) हा महिलेचा फॅमिली डॉक्टर होता. तोदेखील या दुर्घटनेत जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. बुधवारी घटनेनंतर दुंडाप्पा याने आपली पत्नी कारमध्ये जळाल्याची खोटी माहिती दिली होती. पण भाऊ आणि जावई यांनी जखमी व्यक्ती पती नव्हे असे सांगितल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.आता पोलीस तपासात सत्य काय बाहेर पडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.