स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञातांनी बस वाहकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री जानेवाडी (ता. बेळगाव) या गावात घडली.
हल्ल्यात जखमी झालेल्या परिवहन मंडळाच्या बस वाहकाचे नांव मुत्याप्पा वाल्मिकी वय 49 वर्षे असे आहे. तो जानेवाडी (ता. बेळगाव) येथे जाणाऱ्या वस्तीच्या बसवर सेवेला होता. त्याला जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बस चालक एम. एम. शेख हा मात्र हल्लेखोरांचा हल्ल्यातून बचावला आहे.
याबाबतची माहिती अशी की बेळगाव ते जानेवाडी ही परिवहन मंडळाची रात्री वस्तीची बस घेऊन शेख आणि वाल्मिकी हे दोघे काल बुधवारी जानेवाडीला गेले होते. रात्री गावात बस थांबवल्यानंतर बस वाहक अत्यल्प वाल्मिकी हा रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला असता स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या काही अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वाल्मिकीची आरडाओरड ऐकुन ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी जखमी मुत्याप्पा वाल्मिकी याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले. हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हल्ला झाला त्यावेळी बस चालक शेख हा वाल्मिकी सोबत नसल्यामुळे सुदैवाने तो हल्ल्यातून बचावला.
दरम्यान, हा हल्ला रामा कृष्णा होसुरकर व कल्लाप्पा नाईक यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारी नोकर संघटनेतर्फे याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.