बेळगावचे प्रतिभावंत कलाकार अशोक ओऊळकर यांच्या विविध कोलाज चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ शुक्रवारी वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात पार पडला.
सदर समारंभाप्रसंगी उद्घाटक आर. डी. शानभाग आणि प्रमुख पाहुणे अशोक याळगी यांच्यासह जगदीश कुंटे व कलाकार अशोक ओऊळकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आल्यानंतर सुभाष ओऊळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आर. डी. शानभाग यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात शानभाग यांनी अशोक ओऊळकर यांच्या कलेबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट येथे येऊन विद्यार्थ्यांना कोलाजचे शिक्षण देण्यासाठी निमंत्रित केले. अशोक याळगी यांच्या समयोचित भाषणानंतर अशोक ओऊळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बेळगावातील हे आपले 6 वे प्रदर्शन असून आतापर्यंतचे 31 वे प्रदर्शन असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जगदीश कुंटे यांनी केले.
टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात आयोजित या प्रदर्शनात अशोक ओऊळकर यांनी तयार केलेली संत तुकाराम, शिवशंकर, छ. शिवाजी महाराज, गायवासरू, पंत महाराज आदींची लक्षवेधी कोलाज चित्रे मांडण्यात आली आहेत. प्रदर्शनाला शुक्रवारी कलाप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाला.